(मुंबई)
लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने ४५ हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाविकास आघाडीकडून भाजपासह महायुतीला चीतपट करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेते प्रचार, बैठका, कार्यकर्ता मेळावे यांच्या माध्यमातून कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसत आहेत. प्रचाराला वेग आला असून, विविध सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अनेक पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करताना आपल्या मित्र पक्षातील नेत्यांच्या नावांचा देखील त्यामध्ये समावेश केला होता. मात्र स्टार प्रचारक हा त्या पक्षाचाच सदस्य असावा असं आता निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे ही नावे वगळावी लागणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांच्या यादीतून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नाव वगळावे लागणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे निवडणूक लढविणाऱ्या पक्षाचे सदस्य असायला हवेत, असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. या पत्रामुळे भाजपबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून भाजप नेत्यांची नावे वगळावी लागणार आहेत.
Also Read : बाबा वेंगा यांची २०२४ साठी धक्कादायक भविष्यवाणी!
भाजपच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी 26 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून 40 नेत्यांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (रिपाइं) आदींच्या नावांचा समावेश होता. मात्र, प्रचारकांच्या यादीतील अन्य पक्षांच्या नेत्यांच्या नावाला आयोगाने आक्षेप घेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांच्या पक्षाशिवाय अन्य पक्षातील सदस्यांच्या नावाचा समावेश केलेला आहे. स्टार प्रचारक हे संबंधित पक्षाचे सदस्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही बाब सर्व पक्षांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून ही बाब निवडणूक निरिक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, अमित शहा, नड्डा, गडकरी, आठवले, देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर आदींचा समावेश आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1