गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) इस्लामचे अभ्यासक मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांना ताब्यात घेतले आहे. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुंबईतील घाटकोपर भागातून ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना मुफ्ती यांना सध्या घाटकोपर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम १५३ अ, ५०५, १८८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
ही अटक प्रक्रिया चुकीची आहे, आम्ही मुफ्तींना जाऊ देणार नाही अशी भूमिका या जमावाने घेत घोषणाबाजी देखील केली. वातावरण आणखी तणावपूर्ण झाल्याने अखेर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून मुफ्ती सलमान यांना जमवाला शांत रहाण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. मुफ्ती सलमान यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केल्याने जमाव शांत झाला. या दरम्यान दंगल नियंत्रक पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि मोठ्या प्रमाणात सर्व पोलीस ठाण्यातून पोलीस अधिकारी आणि पथके घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. रात्री उशिरा पर्यंत कोणताही निर्णय होत नसल्याने स्थिती तणावाची झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मौलानाने बुधवारी गुजरातमधील जुनागढ येथील एका मोकळ्या मैदानात आयोजित कार्यक्रमात द्वेषपूर्ण भाषण दिले होते. ३१ जानेवारी रोजी जुनागढ गुजरातला मुफ्ती सलमान अझरी यांनी एक भाषण केले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मौलाना मुफ्ती आणि कार्यक्रमाचे स्थानिक आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तेव्हापासून मौलानाचा शोध सुरू होता.
यात आज कुत्तओ का दौर है, कल हमारा आयेगा असे भाषण केले होते. यावरुन हिंदुत्ववादींनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली होती. तर गुजरात पोलोसांनी या बाबत गुन्हा दाखल केला होता. मुफ्ती सलमान हे मुस्लिम धर्मगुरु आहेत. त्यांची धार्मिक भाषणे समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल होत असतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने गुजरात पोलीस हे त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते.