( विशेष /प्रतिनिधी )
जिल्ह्यातील (ता. संगमेश्वर) धामणी येथील ३४ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह बडदवाडी येथे नदी पात्राजवळ एका झुडपात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणात संगमेश्वर पोलिसांची भूमिका आधीपासून संशयास्पद असल्याचे चित्र दिसून येत आहे. मृत प्रशांत पवारच्या कुटुंबीयांनी दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात विशाल संगम पवार यांच्यासह मृत प्रशांतच्या पत्नीवर संशय व्यक्त केला होता. त्याच निवेदनाचा धसका घेऊन संगमेश्वर पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
संगमेश्वर पोलिसांनी कुटुंबियांना दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी समजपत्र पाठवले आहे. यामधून धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. यात असे म्हटले आहे की, मयत प्रशांत बुध्दम पवार (वय. ३५ वर्षे रा. धामणी पवारवाडी) याच्या मयत प्रकरणामध्ये आपण संशय व्यक्त केलेले विशाल संगम पवार व वर्षा प्रशांत पवार यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांच्या दोघांचा एकमेकांशी मोबाईल फोनव्दारे वारंवार संपर्क होत असुन त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचे त्यांनी कबुल केलेले आहे. तसेच त्या दोघांचे मोबाईल वरुन एकमेकांशी संपर्क होत होता त्याकरीता त्या दोघांचे मोबाईल आम्ही ताब्यात घेवुन त्याप्रमाणे त्याची सायबर क्राईम एक्सपर्ट यांच्याकडुन तपासणी करुन घेवुन त्याबाबत अधिक चौकशी करत आहोत. तसेच संशयित विशाल पवार व वर्षा पवार यांचे ज्या ज्या व्यक्तीशी त्या काळात संपर्क झालेला आहे. त्या लोकांना बोलावुन घेवुन त्यांच्याकडे चौकशी देखील करत आहोत. असे ही पोलिसांनी दिलेल्या पत्रात नमूद केले असून सि.टी. कांबळे (पोलीस उपनिरीक्षक) यांच्या सहीनिशी पत्र कुटुंबियांना देण्यात आले आहे.
तसेच प्रशांत पवार हा मयत स्थितीत दि.०६/११/२०२४ रोजी १७.०० वा धामणी बडदवाडी ब्रीजच्या बाजुला नदीचे पात्रात झुडपाखाली मिळुन आलेला असुन त्याबाबत आपण संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असुन त्या तक्रारीवरुन संगमेश्वर पोलीस ठाणे आमृ रजि नं. ३२/२०२४ बी.एन.एस.एस.१९४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला असुन सदर आमृ प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पत्रात म्हटले आहे. परंतु मृत प्रशांत पवारची पत्नी आणि त्याच्या चुलत भावाच्या प्रेम प्रकरणासंदर्भातील महत्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. यामधून आधीपासून कुटुंबीय पोलिसांकडे व्यक्त करत असलेला संशय अखेर खरा ठरला आहे.
दरम्यान संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी मृत प्रशांतचे शवविच्छेदन हे मृतदेह भेटल्यानंतर संध्याकाळी झाल्याचे सांगितले आहे. तसेच प्रशांतच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा मारहाण झाल्याच्या खुणा आढळून आल्या नाहीत. यासोबत प्रशांतचा व्हीसेरा हा रत्नागिरीतील खेडशी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. तो अहवाल लवकर प्राप्त व्हावा यासाठीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही पी आय यादव यांनी रत्नागिरी २४ न्युजशी बोलताना सांगितले आहे.
मृत्युदेह रुग्णालयात आणल्यानंतर कुटुंबियांना डॉक्टर काय म्हणाले?
नदी पात्रातील झाडाझुडुपांमध्ये प्रशांतचा मृतदेह सापडला त्यानंतर मृतदेह सायंकाळीं संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे नेल्यानंतर नातेवाईक यांना डॉक्टर यांनी बोलावून सांगितले की, मृतदेह संशयास्पद आणि घातपातासारखा प्रकार असल्याने त्याचे शवविच्छेदन करिता दोन डॉक्टर पाहिजे, मी उपजिल्हा रुग्णालयाचा डॉक्टर आहे. धामणी हे ठिकाण बुरंबी आरोग्य केंद्रामद्ये येते. PH.C. बुरंबीचे डॉक्टर यांनी दिवसा शवविच्छेदन करणार असे सांगुन, रुग्णालयात मध्यरात्री बारा, साडेबारा वाजेपर्यंत ठाण मांडून बसलेल्या नातेवाईकांना घरी जाण्यास सांगितले.
डॉक्टरांनाही संशय, मात्र पोलीस निरिक्षक सांगतात…
मात्र शवविच्छेदन करण्यापूर्वी तेथील डॉक्टरही घातपातासारखा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करतात. परंतु पोलीस निरीक्षक अमित यादव यांना कोणत्याही जखमा किंवा मारहाण झाल्याच्या खुणा आढळून आल्या नसल्याचे ते स्पष्ट करतात. यावरून पोलीस निरीक्षक यादव यांची भूमिका गरीब कुटुंबाला न्याय देण्याची की अन्याय करण्याची? एकूणच सर्व प्रकरणासंदर्भात तत्काळ पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह तपासिक अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करणे आवश्यक आहे. पोलिसांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असण्याचे कारण काय? पोलीस प्रशासन संशयित आरोपींना पाठीशी घालत आहेत का? मध्यरात्रीपर्यंत नातेवाईक, कुटुंबीय मृत्युदेह ठेवण्यात आलेल्या संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात होते तर पोलीस निरीक्षक शवविच्छेदन त्या संध्याकाळीच झाल्याचे कोणत्या आधारे सांगतात? असे एक ना अनेक थेट सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून संगमेश्वर पोलिसांची आधीपासून संशयास्पद भूमिका आजही कायम असल्याचे दिसून येत आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी संगमेश्वर पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर करून मृत्युदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांना भाग पाडले अशीही माहिती मृत प्रशांतच्या नातेवाईकांसह कुटुंबीयांनी दिली आहे. या प्रकरणाची विविध माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य शोधून काढण्याचे रत्नागिरी पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे.