(चिपळूण)
घरात तसेच आजूबाजूच्या घरांमध्येही कोणी नसल्याचा फायदा घेत वृद्ध महिलेचा खून झाला. कोणाबाबतही संशय घ्यावा, अशी स्थिती नव्हती. तपास कसा करायचा, हा प्रश्नच होता. पण, खून झालेल्या ठिकाणाची झाडाझडती सुरू असताना तेथे ब्लूटूथचे एक उपकरण सापडले. त्याआधारे शोध घेत पोलिसांचे हात संशयित आरोपीच्या कॉलरपर्यंत पोहोचले. रोहित शेट्टी याच्या मसाला चित्रपटाची कथा वाटावी, असा हा प्रकार घडला आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिस स्थानकाच्या हद्दीतील नांदगाव येथे. परिस्थितीजन्य पुराव्यावरून अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करणाऱ्या पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. यावेळी चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे जनार्दन परबकर उपस्थित होते. या तपासात गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, सावर्डेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख, अलोरे शिरगावजचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील, मोबाइल फॉरेन्सिक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मागाडे, सावर्डे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रदीप गमरे, मनिष कांबळे यांच्यासह सावर्डे, गुहागर, अलोरे शिरगाव आणि रत्नागिरी येथील अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
निवृत्त पोलिस पर्शराम पवार (७८) आणि त्यांची पत्नी सुनीता (६९) हे नांदगावमधील घरी राहत होते. पोलिस खात्यातच असलेला त्यांचा मुलगा मुंबईमध्ये असतो. मंगळवारी पर्शराम पवार सायंकाळी साडेचार वाजता दहीहंडीसाठी घराबाहेर पडले. ते पावणेसात वाजता घरी परत आले. मात्र, घरात अंधारच होता. घरात गेल्यावर त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी आसपासच्या लोकांना बोलावले. पोलिसांनाही सूचना करण्यात आली.
रात्री प्राथमिक सोपस्कार होईपर्यंत उशीर झाला असल्याने बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, फॉरेन्सिकचे पथक आणि श्वानपथक घटनास्थळी पोहोचले. कोणी संशयित नाही, कुणाशी वैर वैर नाह नाही, कुणी काही पाहिलेले नाही, अशा स्थितीत आरोपी शोधणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे घटनास्थळाची कसून तपासणी आणि आसपासच्या लोकांशी चर्चा करणे हाच मोठा पर्याय होता. घटनास्थळ तपासताना पोलिसांना तेथे ब्लूटूथच्या दोन उपकरणांपैकी एक उपकरण सापडले. ते घरातील कोणाचे नसल्याने संशय बळावला. तेवढ्यावरून तपासाची चक्रे फिरली. चौकशी करता करता ते शेजारीच घर बांधणाऱ्या स्वप्निल खातू याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आपणच हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले, अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
खुनाचे कारण आरोपीने सांगितले….
सुनीता यांनी आपल्याला बेवडा म्हटले, या रागातून आपण त्यांना मारल्याचे संशयित आरोपीने सांगितले. असे असले तरी त्यामागे अजून काही कारण आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. खुनानंतर चोरीला गेलेले दागिने अजून सापडलेले नाहीत. संशयिताला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात या सर्व गोष्टी उघड होतील, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.