(मुंबई)
येत्या सुट्टीच्या दिवसात कोकण, गोव्याला जाणार्यांसाठी खूषखबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर आता 1 नोव्हेंबर पासून गैर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. तसेच सीएसएमटी-मडगाव- सीएसएमटी ही वंदे भारत ट्रेन शुक्रवार वगळता आता रोज धावणार आहे. पावासाळ्याच्या दिवसात कमी केलेला ट्रेनचा वेग आता वाढवला जाणार असल्याने प्रवास पुन्हा वेगवान होणार आहे. राजधानी सह आता 88 गाड्यांचा वेग वाढवला जाणार आहे.
महाराष्ट्रातून मान्सून परतल्यानंतर आता 1 नोव्हेंबर पासून पुन्हा कोकण रेल्वेवर गैर पावसाळी वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. सध्या कोकणात वेगावान धावणार्या एकमेव वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांची चांगली पसंती आहे. आधी आठवड्यातून 3 दिवस धावणारी वंदे भारत 1 नोव्हेंबर पासून 6 दिवस धावणार आहे. शुक्रवारी देखभाल, दुरूस्तीसाठी ही ट्रेन ऑफ ट्रॅक असेल. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणात आणि गोव्यात जाणार्यांना फायदा होणार आहे. मुंबई आणि गोवा मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस आताच्या घडीला आठवड्यातील ३ दिवस चालवली जाते. मात्र, आता ही वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार सोडून बाकी सगळे ६ दिवस चालवली जाणार आहे. दिवाळी सुट्टी आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
कोकणात धावणार्या रेल्वे मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळण्याची भीती असते. कोकणात बेसुमार पाऊस पडत असल्याने अप्रिय घटना, अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यात कोकण रेल्वे ताशी 75 किमी या वेगमर्यादेमध्ये धावते तर गैर पावसाळी वेळापत्रकात आता मुंबई गोवा मार्गावर काही ठिकाणी रेल्वे गाड्या 100 -120 ताशी किमीच्या वेगाने धावण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
गोवा- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 8 कोच आहेत. तर, ही ट्रेन 11 स्थानकांवर थांबते. मुंबई-गोवा हे 586 किमीचे अंतर पार करण्यासाठी 7 तास 50 मिनिटांचा वेळ लागतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम, मडगाव या स्थानकात ट्रेनला थांबा असणार आहे. मुंबई – गोवा वंदे भारत ट्रेनचं तिकीट १९७० रुपये आणि ईसी अर्थात एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचं तिकीट ३५३५ रुपये आहे. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान आयआरसीटीसीकडून खाण्याचीही सुविधा आहे. वंदे भारतने मुंबई – गोव्यासाठी ७ तास ५० मिनिटांचा कालावधी लागेल. पण वंदे भारतच्या तिकिट दरात बदल होऊ शकतो.
मुंबई-गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो तुमच्या रेल्वेगाडीचा वेग वाढणार का, याप्रश्नाच्या माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES मोबाइल अॅप डाऊनलोड करा, असे आवाहन मध्य-कोकण रेल्वेने केले आहे.