(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरूख शहरामधील शाळा क्र. ३ या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्यस्थितीला प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून पालकवर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुलांना शाळेत येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
देवरुख शहरातील शाळा क्र. ३ ही नावारूपाला आलेली शाळा असून या शाळेचा पटही चांगला आहे. शाळेत पहिलीपासूनचे वर्ग आहेत. शाळेकडे जाण्यासाठी सावरकर चौकातील नाक्याचा रस्ता सोडून पुढे गेल्यावर रस्त्याची दुर्दशा झालेली अवस्था आहे. या रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असुन त्या खड्ड्यात लाल पाणी साचलेले असते. खड्ड्यांमधील साचलेले पाणी नागरिकांसह मुलांच्या अंगावर उडून कपडेदेखील लालेलाल होत असतात. अशा स्थितीतून मुलांना शाळेत जावे लागत आहे, हा रस्ता देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता आहे. तसेच कृषी मंडल कार्यालयातही याच रस्त्याने जावे लागते. एकूणच हा नागरिकांचा महत्वाचा व मुख्य मार्ग असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्त्याकडे दुर्लक्ष्य होत असल्याने सुज्ञ नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या रस्त्याबाबत किती निधी खर्च झाला आहे अथवा नाही याची सर्व माहिती घेऊन संबंधित प्रशासन विभागाला निवेदन देण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले.