(मुंढर / रामदास गमरे)
निर्मल ग्रुपग्रामपंचायत मुंढर-कातकीरी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून संख्याबळ कमी आहे असे कारण पुढे करून सरपंच पदी बौद्ध स्त्री/पुरुष उमेदवारास कधीही संधी मिळाली नव्हती परंतु यंदा गावपॅनलच्या वतीने संघर्ष व तडजोड करून बौद्धवाडीतील महिला उमेदवार सौ. अमिषा अजित गमरे या मोठ्या सन्मानाने सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.
निर्मल ग्रुपग्रामपंचायत मुंढर-कातकिरी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. अमिषा अजित गमरे यांची निवड झाल्याबद्दल बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्र. २४, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी (गाव मुंबई शाखा) यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी शासकीय नियमानुसार कामाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नायब तहसिलदार सावर्डेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यांना सहकार्य करण्यासाठी ग्रामसेवक एस. बी. गोरे, माजी सरपंच प्रदीप अवरे, उपसरपंचा सौ. धनावडे, सदस्य मंडळ, प्रभाकर शिर्के, बाजार समिती अध्यक्ष सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी सौ. अमिषा अजित गमरे यांना सरपंच प्रमाणपत्र प्रदान करताच गाव-मुंबई शाखेच्या व ग्रामस्थांच्या वतीने सौ. अमिषा अजित गमरे यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तद्नंतर ग्रामपंचायत ते जेतवन बुद्धविहार अशी भव्यदिव्य मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी करीत वाजतगाजत निघाली. मिरवणूक गंतव्यस्थानी पोहोचताच त्याचे रूपांतर सभेत करून बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ या शाखेचे अध्यक्ष दर्शन गमरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला. या सभेस बौद्धजन सहकारी संघाचे आजी माजी विश्वस्त, उपचिटणीस बापू मोहिते, गिमवी विभाग क्र. ३ चे विभागीय अध्यक्ष राजू मोहिते, मुंबई व गाव शाखेचे सर्व पंच पदाधिकारी, महिला मंडळ, विद्यार्थी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ या शाळेची विद्यार्थिनी कु. लांजेकर हिची अमेरिका येथील नासा रिसर्च सेंटर इथे वैज्ञानिक अभ्यासक्रमाकरता निवड झाल्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा ही विषेश सत्कार करण्यात आला. सोबतच विभागाच्या, महिला मंडळाच्या वतीनेही त्यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष, तालुक्याचे विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, श्रीपाद गमरे, तालुक्याचे स्थानिक शाखा उपचिटणीस बापू मोहिते, गिमवी विभाग क्र. ३ चे अध्यक्ष राजेश मोहिते, मुंबई शाखा अध्यक्ष विनोद मोहिते, माजी चिटणीस अनिल जाधव आदी मान्यवरांनी शुभेच्छापर आपले विचार मांडून सौ. अमिषा अजित गमरे यांचे पती अजित गमरे यांनी उपसरपंच पदी चांगल्या प्रकारे काम करून गावची सेवा केली आता सौ. अमिषा अजित गमरे यांना सर्वांनी मोठ्या विश्वासाने सरपंच पदी बसविले आहे, तरी त्यांनी सर्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम करून नावलौकिक मिळवावा, गावातील सर्वच स्तरातील ग्रामस्थांमध्ये कोणताही भेदभाव न करता शासकीय सोयींचा गरजूंना मिळवून देऊन मदत करावी अशा सूचना केल्या. सोबतच गावपॅनलच्या माध्यमातून सौ. अमिषा अजित गमरे यांना सरपंच पद मिळवून देण्यासाठी प्रभाकर शिर्के व बाजार समिती अध्यक्ष सुरेश सावंत यांचेही मोठे योगदान असल्यामुळे राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी प्रभाकर शिर्के व सुरेश सावंत यांचे विशेष आभार मानले.
सदर प्रसंगी स्थानिक शाखा अध्यक्ष दर्शन गमरे यांनी आपले विचार व्यक्त करताना “गेल्या ४०-४५ वर्षानंतर का होईना पण आज सरपंच पदाचा जो सन्मान प्राप्त झाला आहे हा केवळ सौ. अमिषा अजित गमरे यांचा सन्मान नसून तो संपूर्ण भावकी व वाडीचा सन्मान आहे त्यामुळे सौ. अमिषा अजित गमरे सदर पदाचा मान राखून सुयोग्य काम करतील अशी आशा व्यक्त करतो” असे नमूद करून शुभेच्छा व्यक्त केल्या. सरतेशेवटी गाव-मुंबई शाखेच्या सर्व उपस्थित मान्यवरांचे, विभागीय मंडळ, महिला मंडळ, विद्यार्थी मंडळ, ग्रामस्थ यांचे अध्यक्ष दर्शन गमरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.