(संगमेश्वर / एजाज पटेल)
मौजे असुर्डे आणि कोंड असुर्डे या दोन गावांमधून वाहणाऱ्या नदीवरील कॉजवेची पार दयनीय अवस्था झाली आहे. डिंगणी -शास्त्रीपुल मुख्य मार्गावरून संगमेश्वर येथे येण्यासाठी अगदी जवळचा मार्ग म्हणुन येथील कॉजवे अतिमहत्वाचा आहे. परंतु कॉजवेची सद्यस्थीतीची दुरावस्था आणि पावसाळ्यात कमी उंची असल्याने पाण्याखाली कॉजवे जात असल्याने “असून अडचण, आणि नसून खोळंबा” अशी स्थिती असल्याने कॉजवेची दुरुस्ती न करता उंची वाढवून नवीन पूल उभारण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे, या मतदार संघांचे आमदार शेखर निकम याची गांभीर्याने दाखल घेतील का?याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या मौजे असुर्डे आणि कोंड असुर्डे या दोन गावांमधून वाहणाऱ्या नदीवर असलेल्या कॉजवे वरून डिंगणी मार्गे संगमेश्वर येथे येण्यासाठी जवळचा मार्ग असून सुमारे सहा ते सात की.मी. अंतर कमी तसेच इंधन व वेळेचीही बचत होत असल्याने, तसेच नदीच्या दोन्ही बाजूच्या गावांतील लोकांना तसेच शाळा -महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाहनाने अथवा पायी ये -जा करण्यासाठी सुद्धा कॉजवेमुळे हा मार्ग अतिशय योग्य समजला जातो.
परंतु गेले काही वर्षापासून येथील कॉजवेची दुर्दैशा झाली आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या असलेल्या कॉजवेवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीट उखडून खडी वर आली आहे. यातून वाहने चालवताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत असून प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊनच येथून प्रवास करावा लागत आहे. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या कॉजवेवर अपघाताच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. अपघाताच्या प्रतीक्षेत व शरीराची हाडंहाड मोकळी आणि वाहनांचा खुळखुळा करणारा जवळच्या मार्गापेक्षा दूरचा आणि अधिक वेळ व इंधनाचा खर्च परवडला म्हणत या मार्गाकडे पाठ फिरवले आहेत. वाहन वर्दळीसाठी धोकादायक असलेला हा कॉजवे पादचाऱ्यांसाठी सुद्धा जीवावर बेतणारा ठरत आहे.
पावसाळ्यात येथील नदी दुथडी भरून वाहते. तसेच पाण्याचा प्रवाह सुद्धा मोठ्या प्रमाणातच असतो. अशा वेळी कमी उंची चा असलेला कॉजवे महिन्यातील कित्येक दिवस पाण्याखालीच असतो. त्यामुळे पावसाळ्यात वाहनाने प्रवास करणाऱ्यांसह जवळच्या गावांमधून ये -जा करणाऱ्या पादचाऱ्यांना वेळ आणि आर्थिक भुर्दंड सोसून वाहनाने शास्त्रीपुल मार्गे संगमेश्वर गाठावे लागते. त्यामुळे नदीवर जोडणार कॉजवे असून अडचण आणि नसून खोलंबा असाच आहे.
दुर्दशेच्या फेऱ्यात अडकलेला व अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या कॉजवेची दुरुस्ती न करता पावसाळ्यातील नदीच्या पाण्याची पातळी व पाण्याचा प्रवाह नजरेसमोर ठेऊन पुलाची उभारणी करणे अत्यावश्यक असून या मतदारसंघांचे आमदार शेखर निकम याकडे लक्ष केंद्रित करणार का? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.