(रत्नागिरी)
मान्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनाबरोबरच रेल्वे प्रवाशांच्या नजरा लागतात कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकाकडे. मान्सूनसाठी कोकण रेल्वेने पूर्ण तयारी केली असून रेल्वेकडून मान्सून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १० जून नंतर कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. पावसाळ्यात रेल्वे मार्गावरील दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वेने हा बदल केला आहे. त्यामुळे गाड्याच्या वेगावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्याच्या प्रत्येक स्थानकावर येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत बदल केला आहे.
कोकण पट्टयात मुसळधार पडणारा पाऊस आणि डोंगराळ भाग यामुळे येथून जाणारा रेल्वेमार्ग खूप धोक्याचा बनतो. मुसळधार पावसामुळे मार्गावरील दऱ्या कोसळून मोठ्या अपघाताची शक्यता असते. यापूर्वी या कारणाने असे अपघात येथे घडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यादरम्यान येथील रेल्वे वाहतुकीवर काही प्रमाणात बंधने घातली जातात. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी २४ तास गस्त घालण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांच्या वेगावर मर्यादा घातल्या जातात. साहजिकच गाड्या प्रवासास जास्त वेळ घेत असल्याने पावसाळ्यात या गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार चालवल्या जातात. यावर्षी दिनांक १० जून २०२४ ते ३० ओक्टोम्बर २०२४ पर्यंत या पावसाळी वेळापत्रकानुसार या मार्गावरील गाड्या चालविण्यात येतील.