(गणपतीपुळे / वैभव पवार)
आजकाल विविध समाजात स्मृतिदिनाचे कार्यक्रम पाहिले तर केवळ धार्मिक विधी पुरतेच महत्त्व दिले जाते. परंतु स्मृतिदिनाला धार्मिक विधीचे महत्त्व देत असतानाच सामाजिक बांधिलकीचीही जोड देऊन स्तुत्य उपक्रम राबवणारी माणसे मात्र दुर्मिळच पाहायला मिळतात. त्यातीलच एक असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे कळझोंडी गावचे सुपुत्र असलेले आणि सध्या श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप- फणसोप तालुका- जिल्हा रत्नागिरी येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले उत्तम पांडुरंग पवार! आपले शैक्षणिक कला अध्यापनाचे काम ते करीत असतानाच समाजाप्रती आपण एक देणे लागतो या उदात्त भावनेतून कळझोंडी गावचे सुपुत्र तथा कलाशिक्षक असलेल्या श्री. उत्तम पवार यांनी आपली आई दिवंगत शकुंतला पांडुरंग पवार हिच्या स्मृतिदिनानिमित्ताने विविध सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.
नुकत्याच झालेल्या आईच्या तृतीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांनी सुनंदा चॅरिटेबल ट्रस्ट एक माणुसकीची भिंत संस्थापक दिनेश लक्ष्मण गुडेकर साखरे टाकीचा पाडा, तालुका जिल्हा पालघर येथील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळेतील 50 मुलांना प्रत्येकी एक वही, एक पेन देऊन त्यांनी प्रोत्साहित करण्याचे काम केले. तसेच यापूर्वी उत्तम पवार यांनी आपल्या आईच्या द्वितीय स्मृतीदिनाच्या निमित्ताने माहेर संस्था खेडशी तालुका जिल्हा रत्नागिरी येथील निराधार संस्थेमध्ये दाखल असलेल्या पुरुष गटातील 45 व्यक्तींना प्रत्येकी एक टॉवेल, बिस्कीटपुडा अशा स्वरूपात साहित्य वाटप केले. त्यानंतर त्यांनी याच निराधार संस्थेमध्ये आपली आई हयात असताना आईला सोबत घेऊन आपल्या स्वतःच्या मुलांचा व भावाच्या वाढदिवस संयुक्तिक स्वरूपात निराधार मुलांसमवेत साजरा करून करून निराधार मुलांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंदाचे क्षण फुलवून अत्यंत सेवाभावी काम केले. यावेळी त्यांनी निराधार संस्थेतील मुलांना आणि एकूण शंभर मुली व महिलांना एकत्रित करून आपल्या व भावाच्या मुलांचा वाढदिवस साजरा करीत त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत केला. असे विविध स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवून आपल्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
तसेच आपल्या आयुष्यात पुण्यकर्म संपादन करण्याचे सेवाभावी कार्य केले आहे. उत्तम पवार यांचा हा आदर्श इतर सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे विविध संस्था संघटनांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.