(मंडणगड)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबडवे (ता. मंडणगड) या महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीकरिता प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे.
आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे यावेळी या उपोषणकर्त्यांनी जाहीर केले. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशी (दि. २७) प्रकृती खालावली होती, त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी प्रशासनाद्वारे पाठवण्यात आले होते. दरम्यान, (दि. २८) रोजी मुंबई विद्यापीठाचे अधिकारी व आंदोलनकर्त्यांच्या वतीने जागृती मंडळाचे प्रातिनिधिक शिष्टमंडळ यांचे मुंबई विद्यापीठ येथे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.
या विषया संदर्भात शिक्षकेत्तर कर्मचारी, देणगीदार जमीन मालक सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, निलेश सकपाळ, उदय जाखल, सुजाता सकपाळ, विनीत सकपाळ, प्रिती तांबे, प्रफ्फुल तांबे, राजेंद्र राऊत, रमेश सकपाळ, सौरव सकपाळ, प्रशांत सकपाळ, अक्षय सकपाळ हे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्यासमवेत जागृती मंडळाचे सुदर्शन सकपाळ व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, आंबडवे येथे झालेल्या महाविद्यालयास गावातील ग्रामस्थांनी देणगीरुपाने १३.५० एकर मोफत जागा उपलब्ध करुन दिली. असे असताना मुंबई विद्यापीठाने ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नाही. विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांनी आम्हांला दिलेला शब्द वेळेवेळी फिरवला आहे. देणगीदारांपैकी सात कुंटबातील व्यक्तींना कामावर घेण्यात आले. अद्याप सहा कुटुंबातील व्यक्तींना रोजगार देण्यात आलेला नाही. कामावर घेतलेल्या सात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्यशासनाच्या कर्मचारी भरतीच्या अटी व शर्थीचे नियमांच्या अधीन राहून भरती करण्यात आलेली नाही. सर्व कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामावर घेण्यात आलेले आहे. दरवर्षी त्यांची मान्यता घेतली जाते त्यांना कामावर कायम करण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही तर ठोक पद्धतीने वेतन दिले जाते.
विद्यापीठाने दिलेल्या या वागणुकीच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवूनही सेवेत कायम करणे, नियमाप्रमाणे वेतन देणे व मागील फरकाची वजावट देणे या तीन मागण्यांसाठी विद्यापीठाचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी गतवर्षीच्या जानेवारी महिन्यापासून चर्चा सुरु आहे. मात्र त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. या संदर्भात लिखित आश्वासन मिळत नाही व योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.
उपोषण करणाऱ्या निलेश सकपाळ व प्रिती तांबे या दोघांची (दि. २७) प्रकृती खालावल्याने त्यांना प्राथमिक तपासणी करून मंडणगड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याचे आंदोलनकर्ते सुशांत सकपाळ यांनी माहिती दिली. मॉडेल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे सलग तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.