(रत्नागिरी)
शहरातील थिबा पॅलेस येथील हरित पट्ट्यामधील १९ गुंठे भूखंडातील वाहनतळाचे आरक्षण उठवून तेथे विकासकाला इमारतीची परवानगी दिली. यापूर्वीच मनसेने इशारा दिला होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष ८ जानेवारी रोजी आंदोलन करीत रास्ता रोको केला. झाडे तोडण्याला परवानगी देण्यात आली आहे, इमारतीला नाही, असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगत पत्र्याचे कंपाऊंड काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी शिंदेसेनेच्या संध्या कोसुंबकर आणि काँग्रेसच्या ॲड. अश्विनी आगाशेही उपस्थित होत्या.
थिबा पॅलेस ते थिबा पॉइंट मार्गावर असलेल्या हरितपट्ट्यातील १९ गुंठे भूखंडावर नगरपरिषदेचे वाहनतळाचे आरक्षण होते. ही जागा रत्नागिरी नगरपरिषदेने खरेदी करावी, असा आदेश २०१७ साली नगररचना विभागाने दिला होता. तेव्हापासून २०२२ पर्यंत नगरपरिषदेने खरेदी प्रक्रिया राबवलीच नाही. त्यामुळे २०२२ला काही जागा मालक उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने नगरपरिषदेला दोन वर्षांत या जागेची खरेदी प्रक्रिया पूर्ण करून जागा मालकांना योग्य मोबदला अदा करावा, अन्यथा दोन वर्षांत हा व्यवहार झाला नाही तर संबंधित जागेवरील आरक्षण उठेल व जागा मूळ मालकाला पुन्हापरत मिळेल, असा निकाल दिला होता. ऑगस्ट २०२४ रोजी दोन वर्षांची मुदत संपली. परंतु नगरपरिषदेने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे नगर रचनाकारांनी ही जागा मूळ मालकाला परत करण्यासंदर्भात आदेश काढले.
मनसेने नगरपरिषद प्रशासनावर जोरदार टीका करत तासभर रास्ता रोको केले. मुख्याधिकारी प्रत्यक्ष येऊन उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही रास्ता रोको मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पाऊण तासाने मुख्याधिकारी तुषार बाबर आले. त्यांनी विकासकाला बांधकामाची परवानगी दिलेली नसून झाडे तोडण्याची दिली आहे. परंतु तेथे पुनर्लागवड केली जाईल. पत्र्याचे कंपाऊंड काढून टाकले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.