(मुंबई)
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, अशी घोषणा त्यांनी आज मंगळवारी (दि. 9 एप्रिल) शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात केली आहे. “देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. माझं महाष्ट्रसैनिकांना एकच सांगायचं आहे, की विधानसभेच्या कामाला लागा”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात जाहीर केली.
“या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले. वेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला. तुमचा पक्ष फोडला म्हणून तुम्ही आरोप करता, पण सत्तेत असताना तुम्ही मलाई खाल्ली नाही का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला.
Also Read : वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो. तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील. विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे, असं सांगितलं होतं. कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आपला देश 10 वर्षांनी पुन्हा वयस्कर होईल. नरेंद्र मोदींनी तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. देशात 6 लाख उद्योगपती देश सोडून गेल्याचं लोकसभेत सांगण्यात आलं. हे आता होता कामा नये. महाराष्ट्र जो कर भरतो त्याचा मोठा वाटा मिळाला पाहिजे, अशी भूमिका देखील राज ठाकरे यांनी मांडली आहे. संपूर्ण देशाला मोदींकडून अपेक्षा आहे. आगामी निवडणूक खड्ड्यात जाणार की वर हे भविष्य ठरवणारी आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, सभास्थळी दाखल झाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक विधान केले. हिंदुत्वासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो तर त्याचा फायदा होणार आहे, या आधीही शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत होतो, त्यामुळे आता जरी एकत्र आलो तर त्यात काही नवीन नसणार असं बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार का? या चर्चित असलेल्या विषयावर देखील आपली भूमिका व्यक्त केली. मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असेल तर तेव्हाच झालो असतो. मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं, मी पक्ष फोडणार नाही, मी स्वत:चा पक्ष काढेल. मी आजही सांगतोय, मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केल आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1