(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्यालगत केलेला भराव व संरक्षक भिंत शुक्रवारी झालेल्या पावसात कोसळली. या घटनेमुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी घाटामध्ये जाऊन पाहणी केली. केवळ मातीचा भराव करून त्यावर दगड लावण्यात आल्याची आणि त्यामुळेच पहिल्याच पावसात तो कोसळल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर आणि या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत आमदार जाधव यांनी सांगितले की, मुंबई-गोवा या ६६ क्रमांकाच्या महामार्गाचे चौपदरीकरण २०११ पासून सुरू आहे. आता २०२४ मध्ये चिपळूण हद्दीत हे काम अंतिम टप्प्यात आले असताना कामाचा निकृष्ट दर्जा वेळोवेळी उघड होत आहे. आता हा रस्ता धोकादायक बनला आहे. केवळ मातीचा भराव करून त्यावर दगड लावण्यात आले. त्यामुळेच पहिल्याच पावसात तो कोसळला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याविषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच पहिल्या पावसात संरक्षक भिंत व भराव कोसळला. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर आणि या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. घटनास्थळी प्लास्टिक कापडाचे आच्छादन टाकून तेथे पावसाचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच वरच्या भागात जेसीबीने चर काढून पाणी दुसऱ्या बाजूला वळवले जात आहे. त्याचबरोबर या भागातील जोडरस्ता पूर्णपणे सील केला आहे.