(रत्नागिरी)
मिरकरवाडा बंदरावरील पथदिप गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. पर्ससीन नेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू झाल्यानंतर बंदरावरील रेलचेल वाढणार आहे. अशावेळी तेथील पथदिप बंद असल्याने रात्रीच्या वेळोवेळी दुर्घटना होण्याची भिती आहे. मिरकरवाडा प्राधिकरणाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे.
पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर १ ऑगस्टपासून पारंपारिक मासेमारी सुरू झाली. ही मासेमारी सुरू होण्यापूर्वीपासून मिरकरवाडा बंदरावरील पथदिप बंद आहेत. मिरकरवाडा प्राधिकरण येथील बंदरावर येणाऱ्या प्रत्येक मच्छिमार नौकेकडून दरमहा ५०० रुपये फी आकारते. प्राधिकरणाकडून बंदरावर आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्याची अपेक्षा असते. परंतु महिनाभरापासून बंद असलेले पथदिप पर्ससीन नेट मासेमारी सुरू होण्याची वेळ आली असतानाही हे पथदिप सुरू करून घेण्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
पर्ससीन नेट मासेमारी नौकांवर मोठ्या प्रमाणात खलाशी काम करतात. हे खलाशी मासेमारी करून नौका जेटीवर आल्यानंतर मद्यपान करून वावरत असतात. अशावेळी काळोखात जेटीवरून चालताना किंवा नौकेवर वावरताना समुद्रात पडून दुर्घटना घडण्याची भीती आहे.