(संगमेश्वर / वार्ताहर)
वर्षभरातील ज्या नक्षत्रापासून पावसाळा प्रारंभ होतो त्या नक्षत्राला मृग नक्षत्र असे म्हटले जाते. निसर्गाच्या विलोभनीय आणि रमणीय नजाकतीय चमत्काराचे आविष्कारात्मक दर्शन घडविणारे हे नक्षत्र आहे. त्यामुळे हे सर्वांना हवेहवेसे वाटते. उन्हाळा व पावसाळा हंगामाच्या समन्वय साधणाऱ्या या नक्षत्राची चाहूल लागते ती एका छोट्याशा मृग किड्यामुळे. ग्रामीण भागात याला मिरग असेही म्हणतात.
तांबूस रंगाचा मखमला सारखा दिसणारा हा छोटा कीटक सर्वसाधारणपणे रोहिणी नक्षत्रापासून दिसू लागतो मृगाचा किडा हा निरुपद्रवी म्हणून ओळखला जातो. कोणत्याही जीवाला जरा धक्का लागला की तो चावा घेणारच हे साधारण सर्व जीवांच्या बाबतीत घडते. मात्र त्याला मृग किडा अपवाद आहे त्याला हातावर घेतल्यानंतर तो कासवा प्रमाणे आपले शरीराला खेटून एका औषधी गोली व लाल टिकली प्रमाणे शांत राहणे पसंत करतो. त्याच्या वैशिष्ट्यामुळे तो अधिकच उठावदार दिसतो त्याच्या दर्शनाने पावसाच्या आगमनाची चाहूल लागते आणि हे ठोकताळे तंतोतंत खरे ठरतात गेली कित्येक वर्षे कोकणातील शेतकरी मृग किड्याच्या दर्शनावर शेतीचे ठोकताळे बांधत आले आहेत.
मात्र हा मृग किडा जन्माला कसा येतो आणि मृत्यूनंतर पुन्हा पुढील वर्षी त्याची उत्पत्ती कशी होते हे अद्याप न सुटलेले कोडे आहे. लहान मुलांना आकर्षित करणारा हा मृग किडा शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची चाहूल देण्यासाठी जन्म घेतो आणि आपले संदेशवहनाचे काम झाले की, लुप्तही होतो. त्याचे आयुष्य हे फक्त रोहिणी नक्षत्र ते मृग नक्षत्र एवढे अल्प आहे. निसर्गाच्या कालचक्रात शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या अनेक संकेतांमध्ये हा छोटासा जीव आपली मोठी ची भूमिका पार पाडून पुढील जन्मासाठी चिरनिद्रा घेतो .
कोंडये, तालुका संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश दसम यांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये ‘मृग ‘ किड्याचा व्हिडीओ कैद केला असून ते बातमी सोबत जोडले आहे.