(रत्नागिरी)
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील 319 अनधिकृत बांधकामे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर 27 जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय विभागाने जमीनदोस्त केली. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे शहरात विविध ठिकाणी त्यांना धन्यवाद देणारे आणि त्यांना हिंदू योद्धा म्हणून संबोधणारे फलक सर्वत्र झळकले होते.
दरम्यान बुधवारी रात्री पेठकिल्ला येथे लावण्यात आलेला त्यांचा बॅनर अचानकपणे काढला गेला होता. सुरुवातीला ही नगर परिषदची कारवाई आहे असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु माहिती घेता या फलकाची विटंबना केल्याचा संशय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना तसेच रत्नागिरीकरांनी व्यक्त केला होता. याच्या विरोधात गुरुवारी रात्री सर्वच रत्नागिरीकर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात जमले होते. अशा समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा या वेळेला करण्यात आली होती. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा नोंदवली आहे.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि रत्नागिरीकर पेठकिल्ला येथे जमले आणि त्यांनी ज्या ठिकाणाहून ना. नितेश राणे यांचा बॅनर काढून टाकला होता तिथेच तो बॅनर जोरदार घोषणा देत पुन्हा झळकवण्यात आला. त्यानंतर ही सर्वच मंडळी मिरकरवाड्याचा प्रवेशद्वार असलेला ठिकाणी गेले आणि तिथे ना. नितेश राणेंचे धन्यवाद मानणारा बॅनर झळकवण्यात आला.
या वेळी उपस्थितांनी जय श्रीराम, भारत माता की जय, नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी मिरकरवाडा आणि पेठकिल्ला परिसर दणाणून सोडला होता. यापुढे अशा अधिकृत कृत्याला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा प्रतिक्रिया या वेळेला भाजपा पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केल्या.