(गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 मालगुंड तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ मौजे मालगुंड आणि आदर्श महिला मंडळ मालगुंड यांचे संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा 127 वा जयंती दिनाचा कार्यक्रम धम्मचेतना बुद्धविहारात साजरा करण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम आदर्श महिला मंडळ मालगुंड यांच्या अधिपत्याखाली साजरा करण्यात येणार असून धम्मचेतना बुद्धविहारात हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी हा कार्यक्रम आदर्श महिला मंडळाच्या उपाध्यक्ष शर्मिला राहुल पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी स्थानिक शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार व त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद बंधूभगिनी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्मचेतना बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या मुर्त्यांसमोर गंध व दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. त्यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धार्मिक पूजापाठ घेण्यात येणार आहे.
यावेळी माता रमाई आंबेडकर यांचे जीवन कार्यावर आधारित अभिवादन सभा घेण्यात येणार असून त्यामध्ये महिला मंडळाच्या सदस्या, शालेय विद्यार्थी व मान्यवरांची भाषणे होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाला वाडीतील लहानथोर भगिनींनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मालगुंड शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार व महिला मंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी केले आहे.