(लांजा)
तालुक्यातील हर्चे पनोरचीवाडी येथील ४५ वर्षीय विवाहित महिला गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी तिच्या पतीने लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली राजेंद्र तरळ (वय- ४५, रा.हर्चे, पनोरचीवाडी,) ही शनिवार दि.२५ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बॅग भरून कोणाला काहीच न सांगता निघून गेली. ती घरी परत न आल्याने पती राजेंद्र पांडुरंग तरळ (वय ४८, रा.हर्चे पनोरचीवाडी) वृषाली तरळ यांनी आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली, सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर राजेंद्र तरळ यांनी बुधवार दि.२९ मे रोजी सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्यात आपली पत्नी वृषाली तरळ ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
वृषाली राजेंद्र तरळ (वय ४५) हिची उंची ४ फुट, रंग सावळा, अंगाने मध्यम, केस काळे व लांब, चेहरा उभट, कानात झुमके, नाकात फुली, गळ्यात एकसर मंगळसुत्र, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, पायात पैंजण व सॅण्डल असून नेसणीस लाल रंगाची फुले असलेली साडी व लाल रंगाचे ब्लाऊज असून तिच्या जवळ इंटेक्स कंपनीचा साधा मोबाईल असून या वर्णनाची व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन लांजा पोलीसांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तेजस मोरे करत आहेत.