(रत्नागिरी)
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रिलायन्स फाउंडेशन , नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील मच्छीमारांना शास्त्रीय माहिती देऊन आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार कसे करावे या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे , विजेचा धक्का लागणे, इत्यादी आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार काय करावे? या बाबतची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. याच अनुषंगाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे या विषयाचे महत्व ओळखून पावस येथील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन , नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी चे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, श्री अजय सूर्यवंशी , रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक , श्री राजेश कांबळे, श्रीमती प्रणाली गोरे , नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरीचे सहाय्यक उपनियंत्रक श्री. ए. एन . गधरी, श्री योगेश पावसकर उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी रत्नागिरीच्या नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक श्री. ए. एन . गधरी यांनी समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास, विजेचा धक्का लागल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR म्हणजे हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासवासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दल माहिती देण्यात आली.
श्री अजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील , नियंत्रण कक्षाची (कंट्रोल रूम) माहिती देऊन, आपत्तीच्या वेळेस, नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचे आवाहन केले, तसेच मासेमारीसाठी समुद्रात जाताना आवश्यक जीव रक्षक साधने सोबत घेऊन जावे असे आवाहन केले आहे. मच्छिमारांच्या वतीने श्री संजय पावसकर यांनी उपस्थित मार्गदशकांचे आभार मानले. या कार्यक्रमास मच्छिमारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.