(चेन्नई)
मराठमोळया ऋतुराज गायकवाड याच्याकडे चेन्नईच्या नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जागी तो आता चेन्नईचे नेतृत्त्व करणार आहे. आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावणा-या संघाचे नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आली. महेंद्रसिंग धोनीने आयीपएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे सुपरजाएंट्स संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. धोनीने चेन्नईला पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिलेले आहे. आता २०२४ च्या आयपीएलपूर्वी चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आल्याने धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
महेंद्रसिंग धोनीऐवजी ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईचे नेतृत्त्व देण्याचा निर्णय हा धक्कादायक नसल्याचे मत देखील सुनंदन लेले यांनी मांडले आहे. ऋतुराज गायकवाड आणि धोनीचा स्वभाव सारखा आहे. चेन्नईच्या टीममध्ये ऋतुराजचे स्थान १०० टक्के पक्के आहे. त्यामुळे नेतृत्त्वाची धुरा मराठमोळ््या युवा खेळाडूकडे देण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड याचे कुटुंबीयदेखील दोन दिवसांपूर्वी चेन्नईत दाखल झाले असल्याने हा राज्याभिषेक होणार अशी कुणकुण मला लागली होती, असेही सुनंदन लेले म्हणाले.
चेन्नईच्या टीममध्ये रवींद्र जडेजा असताना ऋतुराज गायकवाड याला संधी मिळाली, याबद्दल सांगताना सुनंदन लेले म्हणाले की, २०२२ च्या आयपीएलमध्ये नेतृत्त्व रवींद्र जडेजाकडे देताना चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ पातळीवर ऋतुराज गायकवाडच्या नावाचा विचार झाला होता. मात्र, रवींद्र जडेजाची ज्येष्ठता आणि प्रामाणिकपणा याचा विचार करून त्याच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता मात्र, ऋतुराज गायकवाड याचा आणि धोनीचा स्वभाव सारखा असणे, ऋतुराज कष्टकरी आणि मेहनती असल्याने त्याला कॅप्टनपदाची संधी देण्यात आली. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपदेखील मिळवली आहे. संघात त्याचे स्थान १०० टक्के पक्के आहे.
चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधारपदी मराठमोळा ऋतुराज गायकवाड याची निवड झाली असली तरी महेंद्रसिंग धोनी संघात कायम राहणार आहे. यंदा त्याने कर्णधारपदाचे ओझे पेलल्यानंतर पुढे तो चेन्नई संघाचे चांगले नेतृत्व करू शकतो, असा निवडकर्त्यांना विश्वास आहे. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे.
ऋतुराजने यापूर्वीही कर्णधारपदाचा भार पेललेला आहे. ऋतुराज हा महाराष्ट्राच्या संघाचा २०२० पासून कर्णधार आहे. त्यामुळे त्याला नेतृत्व करण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे तो चेन्नईच्या संघाचेही नेतृत्व करू शकतो. यापूर्वी जडेजाला स्थानिक स्पर्धांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्याला चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करणे पेलवले नसावे. पण ऋतुराजकडे मात्र कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याचबरोबर तो अजून ७-८ वर्षे सहजपणे क्रिकेट खेळू शकतो.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1