(चिपळूण)
आजच्या मुसळधार पावसाने चिपळूणकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने चिंचनाका, वडनाका, रंगोबा साबळे रोड, भाजी मंडई परिसर, बाजारपेठेतील काही परिसर, भेंडी नाका, मच्छी- मटण मार्केट परिसर पाण्याखाली गेला आहे. व्यापाऱ्यांची आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धांदल उडाली आहे. तर रस्त्यावर आलेल्या मोठ्या पाण्यामुळे वाहने देखील अडकून पडली आहेत. एकंदरीत चिपळूणमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या सर्व स्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका बसला आहे. खेड जवळ दिवाणखवटी स्टेशन जवळ रेल्वे रुळावर माती आल्याने वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तर मुंबई कडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवली आहे. मुसळधार पावसामुळे श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून आहेत. खेड नजीक दिवाण खवटी (नातूनगर टनेल) नजीक बोगदयानजीक मातीचा भराव रेल्वे रुळावर आल्याने कोकण रेल्वे पुन्हा ठप्प झाली आहे. दरम्यान रुळावर आलेले मातीचा भराव काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच मार्ग वाहतुकीस खुला करण्यात येईल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आज मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चिपळूण तालुक्याला चांगले झोडपून काढले आहे. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. चिपळूण शहरातील मुंबई- गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयासमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याचे पहावयास मिळाले. तसेच शहरातील काही भागात रस्त्यांवर पाणी आल्याने वाहन चालकांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. रविवारी पडलेल्या पावसाने वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
चिपळूणमधील मुंबई- गोवा महामार्गावरील डीबीजे समोरील रस्त्यावर डोंगराकडील पाणी रस्त्यावर आले व त्या पाण्याचा निचरा होण्यास कोणताही मार्ग नसल्याने ते पाणी रस्त्यावर सुमारे दीड फूट साचून राहिले. पर्यायाने कॉलेजच्या बाजूकडील एकेरी मार्गावरील वाहतूक बंद पडली. एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली. याचा त्रास वाहन चालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
चिपळूण पॉवर हाऊस ते भोगाळे मध्यवर्ती एस.टी. स्टँड परिसरातील रस्त्यावर देखील पाणी आले. या पाण्यातूनच वाहन चालकांनी मार्ग काढला. चिपळूण रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या मुरादपूर शंकरवाडी रस्त्यावर देखील पाणी आले. कोकण आंगण परिसरातील शेतांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले. एकंदरीत चिपळूण शहरातील काही सखल भागात पाणी साचले होते.
चिपळूण कराड मार्गावरील खेर्डी दत्तवाडी, माळेवाडी मार्गावरील रस्त्यावर व रेल्वे ब्रिज परिसरात सुमारे दीड ते दोन फूट पाणी साचल्याने येथील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. सततच्या पडत असलेल्या पावसामुळे वाशिष्टी नदीने इशारा पातळी ओलांडली यामुळे प्रशासनाने सतर्कता म्हणून एनडीआरएफची ९ पथके तसेच महसूल, पोलीस, चिपळूण नगर परिषद यांची देखील पथके तैनात ठेवली आहेत. अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली आहे, सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत. अनुराग जितेंद्र जांभारकर यांच्या मालकाची एक सिलेंडर क्षमता असलेली बोट गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आणली जात होती. मंडलीच्या समोरील समुद्रात असतानाच बोट मोठ्या लाटांच्या कचाट्यात सापडली आणि पलटी झाली. बोटीवरील खलाशी समुद्रात पडले. किनारा जवळ असल्याने पोहत समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोचले. बुडालेली बोटही काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु वारा व लाटा यांच्यामुळे ते शक्य झाले नाही. या अपघाताची माहिती समजल्यावर असगोलीवासीयांनी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतली. मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारीही घटनास्थळावर पोचले होते. या अपघातात बोटीचे 2 लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नोंद करण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकारही घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडीतील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.