( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळख देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात केली. मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव करण्यासाठी सव्वा कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे पुस्तकांचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचे कवी केशवसुतांच्या मालगुंड गाववासियांचे अनेक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
वाचन चळवळीला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांना राज्य शासनाकडून चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुस्तकांचे गाव हा एक त्यातील उपक्रम होता. यासाठी कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक आणि विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पुस्तकांच्या गावासाठी केशवसुतांच्या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर मार्च 2021 मध्ये भाषा विकास मंत्रालयाची एक समिती मालगुंडला आली होती. त्यावेळी केशवसुत स्मारकामध्ये कोमसाप पदाधिकारी, मालगुंड ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेण्यात आली होती. प्राथमिक चाचणीत ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळाला होता.
प्रत्यक्ष भेटीवेळी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मालगुंड गावामध्ये किती ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल ठेवता येतील याची पाहणी केली. त्यामध्ये गावातील शाळा, ग्रामस्थांची घरे, हॉटेल्स यासह केशवसुत स्मारक ग्रंथालयाचा समावेश होता. या संबंधित ठिकाणी ग्रंथालयाप्रमाणे रचना केली जाणार आहे.त्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी दोन मोठे स्टॅन्ड, बसण्यासाठी खुर्ची, टेबल ठेवण्यात येणार आहे.तसेच संबंधित ठिकाणी प्रवेशद्वारावर पुस्तकांचे गाव म्हणून पाटी लावली जाणार आहे. त्याचबरोबर आवडीची पुस्तके वाचण्याबरोबरच त्यांच्या विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे यात कादंबरी कथा, कवितांचे दालन चरित्र ग्रंथ यासह वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात येणार आहे.
या निमित्ताने वाचन संस्कृतीला चालना मिळणार असून पर्यटन वाढीलाही मदत होऊ शकते.तसेच नजीकच्या गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यातील वाचन संस्कृतीशी निगडित पर्यटक मालगुंड येथे वळू शकतात त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे तसेच पुस्तकांचे गाव म्हणून मालगुंडचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे.