(जाकादेवी / वार्ताहर)
महाराष्ट्राच्या कोकण विभागातील विद्यार्थ्यांमध्ये एक नवी ऊर्जा आणि सर्जनशीलता मला पाहायला मिळते. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. अशा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देतानाच त्यांना सर्वच क्षेत्रात परिपूर्ण करण्यासाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाळा व महाविद्यालयातून सुरू असलेले प्रयत्न हे समाजासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी काढले.
ते रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कै. सदानंद बळीराम परकर सभागृहात झालेल्या मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंडच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. बळीराम परकर विद्यालयाचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
ते पुढे म्हणाले की, मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरू असलेले कार्य सर्वांसाठीच आदर्शवत आहे. कारण ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी संस्थेचा सायकल बँक हा स्तुत्य उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत आहे. मागील ८० वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने यशाची परंपरा राखत शाळेत नाविन्यता आणणे हे अतिशय खडतर कार्य संस्थेने अखंडित सुरू ठेवणे समाजाच्या विकसनासाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तर वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विनायक राऊत यांनी करताना संस्थेच्या माध्यमातून अत्यंत ग्रामीण भागात सुरू असलेल्या शाळांच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विद्यार्थीपयोगी विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील मयेकर यांनी याप्रसंगी या सर्व कौतुकास माझे सर्व सहकारी संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. विविध अडचणीवर मात करत हे सर्वजण संस्थेच्या ध्येय – धोरणाला अनुसरून कार्य करताना शिक्षणाचा प्रवाह कायम ठेवला आहे. या संस्थेला अनेकांचे सहकार्य लाभत असते. अशावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून काम करताना आपण जो विकासात्मक दृष्टिकोन ठेवला त्यामुळे आपली उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
या वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमात मालगुंड एज्युकेशन सोसायटीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अ. के. देसाई विद्यालयातील सहाय्यक शिक्षक संतोष शांताराम गार्डी, आदर्श मुख्याध्यापक कै. डॉ. दिलीप मुरारी तथा नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्लीचे मुख्याध्यापक आशिष अनिल घाग, संस्थेच्या अनौपचारिक शिक्षण समिती मार्फत दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार रत्नागिरी तालुक्यातील पिरंदवणे गावातील श्रीकांत मांडवकर आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार तन्मय विजय घाणेकर यांना गौरविण्यात आले. तर रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेचे माधव अंकलगे यांना सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष सुनील तथा बंधु मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, संचालक गजानन तथा आबा पाटील, किशोर पाटील, रोहित मयेकर, सल्लागार विलास राणे, मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो – मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रत्नागिरीचे सी.ई.ओ.किर्ती किरण पुजार यांचा सत्कार करताना शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर व मान्यवर पदाधिकारी