(रत्नागिरी)
मलबारी कवड्या धनेश पक्ष्याने जंगली पिंगळ्याची शिकार केल्याची दुर्मिळ नोंद संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. धनेशाला सर्वसामान्यपणे फलाहारी पक्षी म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत त्याने केलेली पिंगळ्याची शिकार अधोरेखित करण्यासारखी आहे. याला पक्षी निरीक्षक प्रतीक मोरे यांनीही दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्रातील सह्याद्रीत प्रामुख्याने धनेशाच्या चार प्रजाती आढळतात. त्यामध्ये भारतीय राखी धनेश, मलबारी राखी धनेश, मलबारी कवड्या धनेश आणि महाधनेश यांचा समावेश होतो. त्यामधील रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने मलबारी कवड्या धनेश आणि महाधनेश या दोन प्रजाती नजरेस पडतात. देवरूखच्या “सह्याद्री संकल्प सोसायटी” कडून या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील “रस्टिक हॉलिडेज”च्या आवारात मलबारी कवड्या धनेशाच्या लक्षवेधी वर्तनाची नोंद झाली आहे.
या धनेश पक्ष्याने जंगली पिंगळ्याची शिकार केल्याचे आढळले. याबाबत नितीन करकरे म्हणाले, आवारामध्ये मलबारी कवड्या धनेश पक्ष्याची दोन घरटी आहेत. १७ मे रोजी दिवसांपूर्वी हा नर मलबारी कवड्या धनेश पक्षी छोट्या पक्ष्यांच्या मागे लागल्याचे पाहिले. त्याने आमच्यासमोरच जंगली पिंगळ्याला धरले. त्यानंतर तो पिंगळ्याला चोचीमध्ये धरून उडून गेला. पावसाळा सुरू झाला असला तरीही यंदा धनेश पक्ष्याचा विणीचा हंगाम विलंबाने सुरू झाल्याची नोंद केली आहे.
या परिस्थितीत घरट्यामधील पिल्लाला भरवण्यासाठीच या नर धनेशाने पिंगळ्याची शिकार केल्याची शक्यता आहे. यापूर्वी महाधनेशाने अशा प्रकारे पिंगळ्यांच्या शिकार केल्याच्या नोंदी आहेत. पिंगळा म्हणजे एक प्रकारचे घुबडच. आकाराने मोठं असतं ते घुबड आणि लहान आकाराच घुबड म्हणजे पिंगळा होय.
धनेश पक्षी हे मुख्यतः फलाहारी असले तरी ते संधीसाधू शिकारी पक्षीसुद्धा आहेत. प्रामुख्याने ते फळे खाणारे पक्षी म्हणून ओळखले जातात; मात्र विणीच्या हंगामात ढोलीतील मादीला आणि पिल्लाला प्रथिने मिळावे म्हणून ते पक्षी आणि सरपटणाऱ्या जीवांची शिकारदेखील करतात. ढोलीतील मादीला नर धनेशाकडून साप, सरडे, उंदीर, वटवाघूळ, खारूताई, छोटे पक्षी असे प्रथिनयुक्त जीव भरवातानाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. पक्ष्यांमध्येही नर धनेश हा मादी आणि पिल्लांसाठी तांबट, कवडा, पिल्लं आणि त्यांची अंडी अशा गोष्टींची तजवीज करतो, असे पक्षी निरीक्षक प्रतीक मोरे यांनी सांगितले.