( खेड )
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्यादृष्टीने शापित बनले आहे. वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांची मालिका अजूनही सुरू आहे. सततच्या अपघातांमुळे घाटातील अवघड वळणावरील संरक्षक भिंत ढासळत चालली आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
संरक्षक भिंतीला धक्का पोहचल्यास वळणावरून वाहने हाकणे जिकरीचे बनणार आहे. राष्ट्रीय महामार्ग खाते अजूनही सूस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भोस्ते घाटातील चौपदरीकरणानंतर वाहनचालकांचा प्रवास सुस्साट झाला असला तरी अवघड वळणावर सतत घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून आजवर नानाविध उपाययोजनांचा अवलंब करूनदेखील सारे प्रयास फोल ठरले आहेत. टायर तंत्रज्ञानाचा अवलंब करूनदेखील अपघात थांबता थांबेनासे झाल्याने वाहनचालकांची डोकेदुखी कायम आहे.
वाहनधारकांसाठी ठरतेय डोकेदुखी
विशेषतः वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडत असलेल्या अपघातांमुळे अन्य वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर अवजड वाहतुकीची वाहने थेट संरक्षक भिंतीवर आदळत असल्याने भिंतीची नासधूस होत आहे. सततच्या अपघातांमुळे संरक्षक भिंत ढेपाळत चालली आहे. मध्यभागी संरक्षक भिंतीला पडलेले भगदाड अवजड वाहतुकीच्या वाहनांसह अन्य वाहनांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
गतिरोधकांसह टायर तंत्रज्ञान कुचकामी
वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी १५ गतिरोधक बसवण्यात आले आहेत. यातील ७ ते ८ गतिरोधक मध्यभागीच उखडले आहेत. संरक्षक भिंतीवर २० हून अधिक टायर बसवून टायर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. त्यातील अवघे ५ टायरच संरक्षक भिंतीवर शिल्लक आहेत. त्यामुळे टायर तंत्रज्ञान कुचकामी ठरले आहेत.