(संगमेश्वर)
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव सुतारवाडी बसथांब्याजवळ सोमवारी दुपारी कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत संंगमेश्वर तालुक्यातील किरडुवे बारगुडेवाडीतील महेंद्र महादेव बारगुडे (वय-४२) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. महेंद्र बारगुडे यांच्या अपघाती निधनाने किरडुवे गावावर शोककळा पसरली आहे. तर बारगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत देवरूख पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र बारगुडे हे आपल्या हिरोहोंडा स्प्लेंडर (MH08AF1957) या मोटारसायकलने देवरूखहून आपल्या किरडुवे गावी जात होते. त्यांच्या पाठीमागे प्रविण बारगुडे बसले होते. त्यांची मोटारसायकल आंबव सुतारवाडी बसथांब्याजवळ आली असता रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने येणाऱ्या झेन कारने (MH08-C / 7491) मोटारसायकलला जोराची धडक दिली.
या अपघातात महेंद्र बारगुडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना देवरूख येथील शासकिय रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. तर त्यांच्या पाठीमागे बसलेले प्रविण बारगुडे हे जखमी झाले आहेत. त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच देवरूखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव व सहकारी कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली. महेंद्र बारगुडे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. महेंद्र बारगुडे यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.