(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीत कोकण विभागातील मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले. विशेष म्हणजे रत्नागिरी- सिंधुदुर्ग, रायगड मतदारसंघात ठाकरे गटाला महायुतीकडून पराभवाचा सामना करावा लागला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांतून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेल्याने किरण सामंत यांनी माघार घेतली आणि त्यानंतर भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. तर दुसरीकडे विनायक राऊत यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून कुडाळच्या वैभव नाईक यांनी अस्तित्वाची लढाई आणि राणेंशी राजकीय वैरामुळे सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र कोकणच्या राजकारणातील मुरब्बी राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.
रायगडमध्ये तटकरे विजयी
रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या महत्त्वपूर्ण लढत पार पडली. अलिबागमधील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्यानंतर सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महायुतीचे सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मते मिळाली, तर त्यांचे महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ५६८ मते मिळाली. तटकरेंच्या विजयानंतर अलिबागसह रोहा, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी जल्लोष केला. तर सुनील तटकरे यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भंडारा उधळण करून आनंद व्यक्त केला.