(संगमेश्वर)
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आणि मासिक “न्यायप्रभात” वृत्तपत्राच्या माध्यमातून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतिक, धार्मिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात समाजाभिमुख कौतुकास्पद कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांचे कौतुक व सन्मान करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन व प्रेरणा देण्याच्या हेतूने विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कार्यकर्तृत्वान व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. या वर्षी संस्थेचा हा पुरस्कार सोहळा दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी श्रीक्षेत्र आळदी, (पुणे) येथे संपन्न झाला.
या वेळी शैक्षिणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दृल सन २०२४ चा राज्यस्तरीय “न्यायप्रभात शिक्षकरत्न” पुरस्कार महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या सहा- शिक्षिका व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याच्या महिला शाखेची सह-सचिव श्रीमती नर्गिस शाहिद अहमद तुळवे मॅडम यांना देण्यात आला. समारंभाचे प्रमुख अतिथी जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ साहित्यिक विश्वगुरू डॉक्टर मधुसूदन घाणेकर आणि अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच न्यायप्रभात वृत्तपत्राचे संपादक श्री शिवाजी खैरे आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम गेली २००१ पासुन सुमारे २४ वर्षे महाराष्ट्र उर्दू हायस्कूल ॲण्ड ज्यु. काॅलेज ऑफ सायन्स, कडवई ता. संगमेश्वर येथे सह-शिक्षिका म्हणून सेवेत कार्यरत आहेत. तसेच गेली ३ वर्षे त्या अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या महिला शाखेची सह-सचिव म्हणूनही उत्तम काम करीत आहेत. त्या उत्तम शिक्षिका असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शैक्षणिक नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करीत असतात.
यापूर्वी देखील श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम यांना रत्नागीरी जिल्हास्तरीय “स्वयंसिध्दा महिला” व मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम नवी मुंबई च्या वतीने “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. आणि आता अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेने संस्थेचे मुखपत्र मासिक वृत्तपत्र न्यायप्रभातचा “न्यायप्रभात शिक्षकरत्न” राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष श्री. सादीक काजी, उपाध्यक्ष डॉ.अन्सार जुवळे व सर्व संस्था-सदस्य तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. रिजवान कारीगर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कड़वई इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रांजल मोहिते त्याचप्रमाणे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक श्री. साजीद निसार व सर्व पदाधिकारी, तसेच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महिला शाखेच्या सर्व पदाधिकारांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व शुभचिंतकांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.