( चिपळूण )
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा कार्यकरिणीची सभा प्राथमिक शिक्षक पतपेढी शाखा चिपळूण येथे रविवार दि.23 फेब्रु.रोजी राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्री.संतोष कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रथम जिल्हाध्यक्ष श्री.संतोष कदम यांना गोंदवले येथे आयोजिलेल्या राज्याच्या भव्यदिव्य महामंडळात राज्य कार्याध्यक्ष हे मानाचे पद घोषित करणेत आले. रत्नागिरी जिल्हा शाखेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. याबद्दल जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान करणेत आला.
प्रास्ताविकात सर्व जिल्हा पदाधिकारी, मार्गदर्शक, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सत्काराबद्दल धन्यवाद दिले. यानंतर खालील विषयांवर चर्चा करणेत आली.
1) राज्य शासनाच्या संच मान्यतेच्या नव्या शासन निर्णयामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहे. ही संच मान्यता तत्काळ रद्द करावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मागणी केल्याची माहिती राज्याध्यक्ष श्री बाळासाहेब मारणे यांनी जाहीर केले असे सांगण्यात आले. यासंदर्भात राज्य कार्यकारिणी मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात मंत्रीमहोदय यांची भेट घेणार आहे, असे राज्य कार्याध्यक्ष यांनी माहिती दिली. संचमान्यता रद्द न झाल्यास राज्य संघ तीव्र आंदोलन करणार आहे, असेही सांगितले.
2) जिल्हा अधिवेशन संदर्भात चर्चा करणेत आली यामध्ये संघाचे दैवत श्री संभाजीराव थोरात (तात्या) यांच्या आदेशानुसार लवकरच जिल्हा अधिवेशन तारीख जाहीर करण्यात येईल. या जिल्हा अधिवेशनाला नूतन सर्व राज्य कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे, अशी मा.राज्य कार्याध्यक्ष यांनी माहिती दिली. तसेच जिल्हा अधिवेशन पदांची निवड करताना संघटनेच्या ठरावाप्रमाणे एक व्यक्ती एक पद हा नियम लागू राहणार आहे, असे निक्षून सांगण्यात आले.
3) चिपळूण तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची जिल्हाध्यक्ष यांनी घोषणा केली. उद्यापासून या कार्यकारिणीने कार्यान्वित व्हावे असे आदेशित करणेत आले. प्रमुख पदाधिकारी खालीलप्रमाणे:-
तालुकानेते – श्री.दिलीप बुदर,
तालुकाध्यक्ष – श्री.राजेश सोहनी,
सचिव – श्री. सुनिल चव्हाण,
कार्याध्यक्ष-श्री.अविनाश भंडारी,
कोषाध्यक्ष – श्री.अजय कदम.
महिला तालुका प्रमुख-सौ. मधुरा सोहनी.
जिल्हा कार्यकारिणीने नूतन तालुकाध्यक्ष व तालुका सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्य कार्याध्यक्ष यांनी प्रत्येक तालुक्यात राज्याप्रमाणे कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करून त्यावर योग्य व्यक्तीची निवड करावी असे आदेशित केले.
4) सकाळच्या शाळेसंदर्भात चर्चा झाली असता आज सोमवार दि.24 फेब्रुवारी रोजी जिल्हा समन्वय समिती मुख्यकार्यकारी अधिकारी महाशय व शिक्षणाधिकारी यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये सर्वानुमते शनिवारची वेळ पूर्वी प्रमाणेच सकाळी ७.३०ते१०.३० व उन्हाळी शाळेची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते११.३० ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती देणेत आली. शेवटी जिल्हा सचिव श्री. संदीप जालगावकर यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.