(रत्नागिरी)
आश्रमात येणारे भक्त महाराजांची चौकशी करत असल्याने आठवण येत असल्याचा नैराश्येतून दोन शिष्यांनी आत्महत्या केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. स्वरूप माने (वय २४, रा कवठे पिरान सांगली) व सुशांत सातवेकर (वय १९ निपाणी बेळगांव) अशी मृतांची नावे आहेत. आंबा घाटातील सड्याचा कडा ठिकाणाजवळ दोन मृतदेह शनिवारी सायंकाळी मृतदेह आढळून आल्याने देवरुख व शाहूवाडी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
मृतदेह दाट जंगलात व खोल दरीत असल्याने पहिल्या दिवशी मृतदेह काढण्यास उशीर झाला; मात्र रविवारी सकाळी पुन्हा मृतदेह काढण्यासाठी राजू काकडे हेल्प अकॅडमी देवरुख व आंबा हेल्प अकॅडमी आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विभागाने ही मोहीम पार पाडली. दाट धुके सुमारे तीनशे फूट खोल दरी व जंगल यामुळे मृतदेह काढण्यासाठी फारच कसरत करावी लागली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पाठविण्यात यश आले. दोघेही कागल येथील जंगली महाराज यांच्या आश्रमातील शिष्य होते, अशी माहिती स्वरूप याचा भाऊ ओंकार माने यांनी साखरपा पोलिसांना सांगितले. ते शिष्य म्हणून आश्रमात राहत होते मात्र वातावरणात बदल म्हणून घरी फोन करून पावस येथे जात असल्याचे सांगितले.
पोलिसांत नोंद
ओंकार यांच्या मालकीची दुचाकी ही १७ ऑगस्ट चांदोली अभयआरण्य गेट जवळ आढळून आल्याने शोधाशोध सुरु केली असता दरीच्या दिशेने कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. ही घटना शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून मृतदेह देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळाल्याने साखरपा पोलीस दुरक्षेत्रात नोंद करण्यात आली.