(मुंबई)
महाराष्ट्र विधानसभेचे पडघम कधीही वाजू शकतात. येत्या २४ तासात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली असून जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून अनेक लोकप्रिय निर्णय घेतले जात असताना दुसरीकडे काँग्रेसमध्येही विधासभेसाठीच्या जाहीरनाम्यावर चर्चा चालू आहे. काँग्रेसकडून जाहीरनाम्यात अनेक मोठ्या योजनांचा समावेश केला जाऊ शकतो. मविआ सत्तेत आल्यास कर्नाटकाच्या धर्तीवर महालक्ष्मी योजना आणणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं आहे. काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना जास्त पैसे देणारी महालक्ष्मी योजना सुरू करू, असं आश्वासन नाना पटोलेंनी दिलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसनं जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेची घोषणाही केली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे प्रमुख ६ नेते राहुल गांधी यांच्या कायम संपर्कात असून या बाबत चर्चा करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड हे दिल्लीतील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जाहीरनाम्यावर चर्चा करण्यात आली.
काँग्रेसने महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी महालक्ष्मी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना आहे. महिलांना एसटीचा प्रवास मोफत करण्याची तरतूदही केली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार असून सुमारे ६० हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये या योजनेचा समावेश केला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. ‘स्त्री सन्मान योजने’अंतर्गत महिलांसाठी मोफत बसप्रवास, आरोग्य विमा योजनेंतर्गत कुटुंबातील सदस्यांसाठी २५ लाखांचे विमाकवच अशा योजनांचा समावेशही जाहीरनाम्यात असू शकेल. विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर जाहीरनामा जनतेसमोर ठेवला जाणार आहे.
युवकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसतर्फे मोठी आश्वासनं दिली जाऊ शकतात. उपलब्ध माहितीनुसार बेरोजगारांना महिन्याला 4000 रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेअंतर्गत साधारण 6.5 लाख युवकांना हा भत्ता दिला जाण्याची शक्यता आहे.