(रत्नागिरी)
प्रयागराज येथे सुरू असलेल्या पवित्र महाकुंभ पर्वात आतापर्यंत ६० कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. मात्र काही कारणांना सर्वांनाच यात सहभागी होता येत नाही. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात अनुलोमतर्फे महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. रत्नागिरी तालुक्यात मिऱ्या येथे गुरुवारी सायंकाळी या महाकुंभ तीर्थ कलशाची वाजत- गाजत मिरवणूक व ग्रामदेवता श्री नवलाई पावणाई मंदिरात दर्शन सोहळा रंगला. या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
मिऱ्या येथील उपळेकर बाग येथून सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात अमृत कलशाची मिरवणूक सुरू झाली. यामध्ये महिला, पुरुष ग्रामस्थ पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. ही मिरवणूक नवलाई-पावणाई मंदिरात पोहोचली. त्या वेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत या तीर्थ कलशाचे जल्लोषात व अपूर्व आनंदात स्वागत केले. येथे कलशाचे औक्षण करण्यात आले. हा कलश प्रयागराज येथे जाऊन आलेल्या युवराज बनसोडे यांनी पारंपरिक वेशभूषेत हाती घेतला होता. त्यांनी सुरेख शंखवादनही केले.
मंदिरामध्ये सजवलेल्या चौरंगावर या अमृत कलशाला स्थानापन्न करून त्याचे पूजन पुजारी गुरव यांनी केले. तीर्थ कलशाचे पूजन झाल्यानंतर निवडक जोडप्यांनी कलशाचे पूजन केले. आरती करण्यात आली व नंतर सर्वांनी दर्शन घेतले, प्रसादवाटप करण्यात आले. अनुलोमचे कोकण विभागप्रमुख रवींद्र भोवड, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उपविभागप्रमुख तनया शिवलकर तसेच नवलाई पावणाई मंदिर अध्यक्ष दिनेश सावंत, अनुलोम वस्ती मित्र राकेश मयेकर, कार्यक्रम समिती सदस्य स्वप्नील शिवलकर, दादा शिवलकर, प्रकाश बनप, अनिल गुरव, विनीत सावंत, उदय मिरकर, समीर तांडेल, अनिता शिरधनकर, दीक्षा सावंत, अमृता मिरकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
अनुलोम कोकण विभागप्रमुख रवींद्र भोवड, म्हणाले की, अनुलोम ही समाजामध्ये सकारात्मक विचार करणारी संघटना आहे. समाजातील प्रत्येक घटकामध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर महाकुंभ होत आहे. त्रिवेणी संगमावर ज्यांना जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी महाकुंभ तीर्थ दर्शन कार्यक्रम महाराष्ट्रात राबवला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्याच्या विविध भागांतही याचे नियोजन केले आहे, त्याचा लाभ घ्यावा.
पाच हजार तरुण संन्यासी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग व्यवस्थेतील स्वयंसेवक संजय महाडदळकर यांनी प्रयागराज येथील कुंभमेळा, हिंदूंचे एकत्रीकरण यासंदर्भात बहुमोल माहिती दिली. ते म्हणाले की, या कुंभमेळ्यामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ५ हजार तरुण संन्याशांनी दीक्षा घेतली. देव, देश, धर्मासाठी योगदान व रक्षण केलं पाहिजे, असा संदेश महाकुंभ पर्वणीने दिला आहे. अनुलोमच्या प्रयत्नातून तीर्थ दर्शनाचा लाभ मिळाला. विविध पीठ, आखाड्यांचे साधू, संतांचे एकत्र आले. १५ हजार धर्मगुरु एकत्र आले. हिंदू धर्मावरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहाद या बाबतीत काही योजना करण्याचा विचार समरसता महाकुंभ २५ हजार साधूसंत जमले.