(रत्नागिरी)
शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. सुरुवातीला ही योजना DCPS या नावाने होती. त्यानंतर त्याचे NPS असे नामकरण करण्यात आले. आता GPS आणली आहे. मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या भवितव्याबाबत साशंक आहेत.
महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह खालील मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व जुनी पेन्शन समन्वय समिती जिल्हा रत्नागिरीच्या वतीने रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी दु. 12 ते 4 या वेळेत भव्य महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
- महाआक्रोश मोर्चातील प्रमुख मागण्या
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. - शिक्षण सेवक हे अन्यायकारक पद रद्द करून नवीन भरती झालेल्या शिक्षकांना नियमित वेतनश्रेणीचा लाभ द्यावा.
- आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या DCPS खाती जमा रक्कमा आजपर्यंतच्या व्याजासह त्यांच्या NPS खाती वर्ग करणे.
- शालेय शिक्षण विभागाचा दि. 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार संच मान्यतेच्या अटी रद्द कराव्यात.
- सर्व शिक्षकांना 10, 20, 30 ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
- रत्नागिरी जिल्ह्यातील बी.एल. ओ. म्हणून काम करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात.
- नवभारत साक्षरता कार्यक्रमासह विविध अशैक्षणिक व ऑनलाईन कामे रद्द करण्यात यावीत किंवा स्वतंत्र यंत्रणेकडून करून घ्यावीत.
- शालेय शिक्षण विभागाचा दि. 21 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षक भरतीच्या अटी रद्द कराव्यात.
- शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथील करण्यात यावी.
- MSCIT मुदत वाढवून 31 डिसेंबर 2020 पर्यत करण्यात यावी.
वरील सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी महाआक्रोश मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अंकुश चांगण व जिल्हा सचिव श्री. दत्तात्रय क्षिरसागर यांनी केले आहे. जिल्हा भरातील कर्मचारी व शिक्षक संघटनांचा या महाआक्रोश मोर्च्यास सक्रीय पाठिंबा आहे.