(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिरात संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांचेवतीने शनिवार दिनांक 10 ते शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात श्रींच्या उत्सवाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या निमित्ताने मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा गणपतीपुळे येथे संपन्न होणार आहे.
या माघी यात्रेला अंगारक योग जुळून आला आहे. त्यामुळे माघी यात्रा ही स्थानिक भाविकांची असली तरी यात्रेला अंगारक योग जुळून आल्याने स्थानिक भाविकांबरोबरच घाटमाथ्यावरील भाविकांचा ही मोठा जनसागर उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. माघी यात्रा ही स्थानिकांची यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेला घाटमाथ्यावरील भाविकांपेक्षा स्थानिकांची मोठी गर्दी होत असते. त्यामध्यें स्थानिक गणपतीपुळे बरोबर नजीकच्या भंडारपुळे, मालगुंड, वरची निवेंडी, भगवतीनगर, वरवडे, नेवरे, धामणसे, ओरी, जाकादेवी, खंडाळा या भागातून तसेच संपूर्ण रत्नागिरी तालुका व जिल्हाभरातील लोक या यात्रेला मोठ्या प्रमाणात येत असतात या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांकडून “श्रीं” चे दर्शन घेऊन यात्रेनिमित्ताने आलेल्या दुकानांमधून विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटला जातो.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे मंदिरात शनिवारी नियोजनात्मक बैठक रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी घेण्यात आली. या बैठकीत माघी यात्रेच्या उत्सवाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीला संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे सरपंच विनायक राऊत विनायक राऊत व पंच, मुख्य पुजारी, व कर्मचारी उपस्थित होते. तसेच या बैठकीला जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांच्या रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी नियोजनात्मक बैठक घेऊन या यात्रेनिमित्ताने कुठलाही अनुचित प्रकार व स्थानिक भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य त्या सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. एकूणच माघी यात्रेसाठी स्थानिक भाविक मोठ्या संख्येने आतूर झाले असून या निमित्ताने गणपती मंदिरात स्थानिक भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था अतिशय योग्य प्रकारे व्हावी, यासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे कडून सुयोग्य नियोजन केले जाणार आहे. एकूणच,गणपतीपुळे मंदिरात सुरू झालेल्या माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थान श्री देव गणपतीपुळे कडून मंदिर परिसरात आकर्षक पद्धतीने सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर गजबजून जात असून संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. शिवाय माघी यात्रेला जिल्हाभरातून व स्थानिक ठिकाणचे विविध दुकानदार दाखल झाले असून या ठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच संपूर्ण गणपतीपुळे परिसरात यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार व संशयास्पद हालचाली आणि वाहनांची वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन आणि एकूणच संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सज्ज आहेत.