(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात गुरूवार दिनांक 30 जानेवारी ते मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी या कालावधीत प्रतिवर्षीपमाणे संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिर व मंदिर परिसर श्रींच्या उत्सवाचे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यामध्ये गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत श्रींची महापूजा व प्रसाद त्यानंतर सायंकाळी चार ते सात या वेळेत गणेशयाग देवता स्थापना होणार आहे. तर दररोज गुरुवार दिनांक 30 जानेवारी ते रविवार दिनांक 2 फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत सामुदायिक आरती व मंत्र पुष्प होणार आहे.
शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहूती संपन्न होणार आहे. त्यानंतर दिनांक 1 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा संपन्न होणार आहे .या यात्रेनिमित्त सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सहस्र मोदक समर्पण सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार आहे .त्यानंतर दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रथ सप्तमी निमित्त महाप्रसाद दुपारी साडेअकरा ते दोन या वेळेत देण्यात येणार आहे. तसेच दररोज ३० जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत नागपूर येथील कीर्तनकार ह .भ. प.श्री मोहन बुवा कुबेर यांची सुश्राव्य कीर्तने अर्थात किर्तनमाला संपन्न होणार आहे.
3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता श्री कुणाल भिडे प्रस्तुत स्वरसंध्या हा गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामध्ये गायक कुणाल भिडे आणि वैष्णवी जोशी यांच्या सुरेख आवाजातील प्रचलित भक्ती गीते, नाट्यगीते, भावगीतांची सुरेल मैफिल रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता श्रींच्या मंदिर प्रांगणातील भव्य रंगमंचावर गणपतीपुळे येथील श्री गणेश प्रासादिक नाट्यमंडळ यांच्या वतीने आचार्य अत्रे लिखित धमाल विनोदी नाटक मोरूची मावशी सादर करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने नियोजित वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळे चे सरपंच डॉ. श्रीराम केळकर आणि पंच मंडळींनी केले आहे.