(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे या जिल्यातील शाळा अतिशय डोंगरकपारीत आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या सोयी देखील नाहीत. गावात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब शहरकडे स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा पट कमी झाला आहे. जिल्यात 500 हून अधिक शाळा दहा पेक्षा कमी पट असलेल्या आहेत. अनेक शाळा पोर्टल शिक्षक भरती होऊनही शून्य शिक्षकी आहेत. पवित्र पोर्टल हे कोकणासाठी कायम अपवित्र झाले आहे. एका विशिष्ट जिह्यातील पवित्र पोर्टलला जास्त शिक्षक भरती होतात, तर एका भागातील फार कमी शिक्षक भरती होतात, हा संशोधनाचा विषय बनलाय.
कोकणातील शाळा या बंद करण्याचा अंतर्गत प्रयत्न केला जातोय. वाडी वस्तीतील कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस दिसत आहे. कोकणातील लहान लहान अतिदुर्गम भागात शिकणाऱ्या मुलांना याचा फटका बसणार आहे. गरिबांची मुलं यात भरडली जाणार आहेत.. या सर्व बाबींचा विचार करून कोकणचे सुपुत्र माजी शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांनी युती सरकार असतानाच 10 पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा शासन निर्णय 23 सप्टेंबर 2024 ला घेतला होता. पुन्हा एकदा युती सरकार असतानाच शिक्षण मंत्री दुसरे होताच कोकणातील जागा इतर जिह्यातील शिक्षकांना मिळणार नाहीत. सर्व स्थानिक शिक्षक लागतील त्यामुळे कोकणतील शाळा सुरु राहतील. हे सर्व होऊ नये या हेतूने 10 फेब्रुवारी 2025 ला कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.. या निर्णयाचे स्थानिक डी.एड, बी.एड धारकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे..
येणाऱ्या काळात जन आंदोलन उभे करून एकही शाळा बंद पडू देणार नाही आणि रोस्टर प्रमाणे शिक्षक उपलब्ध झालाच पाहिजे…
15 मार्च 2024 चा संचमान्यांतेचा शासन निर्णयाची अंमलबाजणी झाल्यास ग्रामीण भागातील शाळांना एकच शिक्षक मिळणार आहे. यात कोकणचे म्हणजेच जास्त नुकसान रत्नागिरी जिल्ह्याचे होणार आहे. रत्नागिरी जिल्हा भरती केंद्र बनले आहे 2023 मध्ये जवळपास साडेसातशे शिक्षक जिल्हा बदलीने गेले. शाळा उघडायला शिक्षक नव्हते. स्थानिक कंत्राटी सातशे शिक्षक नियुक्त केले, त्यामुळे शिक्षण विभाग सावरला. जवळपास पंधराशे शिक्षक पोर्टल भरतीने जून 2024 ला मिळाले आणि सर्व कंत्राटी शिक्षकांना काढून टाकले. पुन्हा सप्टेंबर 2024 ला साडेतीनशे शिक्षक जिल्हा बदली करून गेले. अनेक शाळा शून्य शिक्षिकी झाल्या. त्यामुळे पुन्हा 500 कंत्राटी शिक्षक घेतले. आता पुन्हा पवित्र पोर्टल भरती सुरु आहे. कंत्राटी शिक्षकांवर टांगती तलवार आहे. सरकारने याचा पुनर्विचार करावा आणि कंत्राटी शिक्षक भरती सुरु ठेवावी. हे सर्व असेच सुरु राहणार असेल आणि स्थानिकांवर अन्याय होणार असेल तर खपवून घेलते जाणार नाही, कोकणी हिसका दाखवणार.