(देवरूख / सुरेश सप्रे)
माखजन करजुवे भागातून रात्रीच्या वेळी वाळूची खुलेआम ५০ वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू असताना स्थानिक महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच याकड़े जातीने लक्ष घालून या अनधिकृत वाळू वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली आहे
जिल्हातील वाळू चोरी व वाहतूक रोखण्यासाठी शासनाने महसूल प्रशासनासह. आरटीओ व पोलीस प्रशासनाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. संबधीतांना आदेश देवूनही त्याकडे कानाडोळा केला जातो आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडुन वाळू माफियाविरोधात वेगवेगळ्या उपाययोजना केले जात असतानाही वाळू माफियांच्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिकांकडुन संताप व्यक्त केला जात आहे.
आठवडाभरापूर्वी जयगड आणि गडनदी खाडीपात्रातून सक्शन पंपाच्या सहाय्याने दिवसढवळ्या बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर अवजड वाहनांनी वाळू वाहतूक करण्यात येत होती. मात्र या विरुद्ध ओरड सुरु झाल्यावर आता वाळू माफियानी आपला पवित्रा बदलून काळोख पडल्यावर आपले काळे धंदे सुरु केले आहेत.
दिवसा शंभरहून अधिक विविध अवजड वाहनातून वाळू वाहतूक करण्यात असल्याची चर्चा आहे. मात्र यासाठी शासनाच्या तिजोडीत एक पैसाही भरणा करण्यात येत नाही. ही वस्तुस्थिती असताना प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आता वाळूचोरांनी संध्याकाळी वाळू उपसा करण्याचे धोरण अवलंबले आहे. संध्याकाळनंतर अवजड वाहनातून वाळू चोरी करून वाहतूक करण्यात येत आहे.
नेहमी तत्पर असणाऱ्या पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल विचारला जात आहे. संगमेश्वर तालुक्यात तसेच करजूवे,माखजन भागात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यावर काही केल्या नियंत्रण केले जात नाही. वाळूगटांचे लिलाव झालेले नसताना खाडी आणि नदीपात्रांमधून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. सरकारी यंत्रणा वाळूमाफियांसमोर हतबल झाल्या आहेत. लाखो ब्रास वाळू उपसा करून ती वायुवेगाने फिरणाऱ्या डंपरद्वारे पोचविली जात आहे.
एकीकडे या अवैध उपशामुळे नदीपात्रांची हानी होऊन पर्यावरण धोक्यात येत आहे, तर दुसरीकडे बेभान वाहतुकीमुळे रस्ते खराब झाल्याने अपघात होऊन जीवितहानीही होण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर त्वरीत आळा घालण्यासाठी संबधीत अधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.