(संगमेश्वर / एजाज पटेल)
शनिवारी धामणी येथे राष्ट्रीय महामार्गांवर एर्टिगा आणि वेगनआर या दोन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात एर्टिगामध्ये प्रवाशांच्या मालकीचे तीन किमती कुत्रे होते. त्या कुत्र्यांना सुद्धा मार लागला होता. त्या कुत्र्यांवर संगमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने पशुधन अधीकारी यांनी त्वरित उपचार केल्याने त्यांचे जीव वाचले आहेत.
शनिवारी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर रेल्वेरोड स्टेशनपासून जवळच असलेल्या धामणी येथील मोरया धाब्यासमोर भरधाव वेगात HR 55 AR4131 नंबर असलेली एर्टिगा गाडी घेऊन येणारा चालक अतुल नंदा याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गणपतीपुळे येथे जाणाऱ्या MH EY 4305 वेगनअर ला जोरदार धडक दिली. ही गाडी ओंकार घाटगे चालवत होते. समोरासमोर दोन गाड्यामध्ये धडक बसून झालेल्या अपघातात वेगनअर चालकासह दोन्ही गाडयांमधील एकूण सात प्रवाशांना मार लागला होता. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर एका महिलेला प्राथमिक उपचार करून अधिक पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले.
तर एर्टिगामधून प्रवास करणाऱ्या व गंभीर जखमी झालेल्या लिंडा मेलवीन डीकॉस्टा या महिलेचे पकी जातीचे तीन कुत्रे अपघातात जखमी झाले. त्यावेळी त्या अपघातग्रस्त एर्टिगामध्ये ते होते. ते तिन्ही कुत्रे अपघातावेळी वेळी सैरवैर होऊन भीतीने धबकले होते. तर एका कुत्र्याच्या पायाला दुखापत झाली होती. या कुत्र्यांवर उपचार होणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन जवळच असलेल्या संगमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मनोहर ढाकणे यांना कल्पना दिली असता त्यांनी त्या कुत्र्यांवर त्वरित उपचार केले.