(राजापूर)
तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावात देशी दारू दुकानाला परवानगी न देण्याचा एकमुखी ठराव संमत केला आहे. सरपंच बाबालाल फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव संमत करण्यात आला असून, या ठरावानंतर ग्रामस्थ व महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात या ठरावाचे जोरदार स्वागत केले. पाचल विभागातही या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
गावातील एका व्यक्तीने गावात देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. या अर्जावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान एका ग्रामस्थाने याला समर्थन देण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्व ग्रामस्थ व महिलांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर सरपंच बाबालाल फरास यांनी याला ज्यांचे समर्थन असेल, त्यांनी हात वर करावे, अशी सूचना केली. त्यावर सभागृहातील एकानेही हात वर केला नाही. त्यामुळे देशी दारू सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेला अर्ज एकमुखाने फेटाळण्यात आला. यापुढे गावात देशी दारू दुकानाला परवानगी न देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
या ग्रामसभेत बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आला. अशा प्रकारच्या घटना आपल्या गावात होऊ नये, म्हणून सतर्क राहण्याचे आवाहन माजी सरपंच अशोक सक्रे यांनी केले. यावेळी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पूजा शिगम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.