(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील दळे सडेवाडी सौ. सानिका लाड आणि कृष्णा लाड या उभयतांनी प्रसंगावधान राखत आणि तत्परतेने खोल टाकीत पडलेल्या वासराला टाकीच्या बाहेर जीवदान दिले आहे .
सडेवाडी येथील सौ .रेशम लाड याना आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरील पार्लरच्या खिडकीमधून मागील बाजूला नवीन घराचे काम सुरू असलेल्या टॉयलेटच्या टाकीमध्ये काहीतरी तरंगताना दिसले.त्यांनी तात्काळ आपले दिर कृष्णा लाड यांना हाक मारून मागे काय आहे बघण्यास सांगितले. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली त्या टाकीमध्ये एक वासरू पडले होते. जीवाच्या आकांताने ते तरंगत होते. तात्काळ सौ सानिका लाड आणि कृष्णा लाड या उभयतांनी त्या वासराला टाकीच्या बाहेर काढले आणि आपल्या घरी आणून त्याला खायला दिले.
सुदैवाने वासराला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नव्हती. आजूबाजूच्या परिसरातील काही लोकांना फोन करून अशा प्रकारचे वासरू कोणाचे आहे का याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोणाचे वासरू आहे समजू शकले नाही त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सदरील फोटोतील वासरू* कोणाचे असेल तर त्यांनी लाड कुटुंबीयांशी संपर्क साधावा असा मेसेज टाकण्यात आला. त्यानंतर ते वासरू दळे शिवगण वाडीतील असल्याचे समजले त्या शेतकऱ्याने सकाळी त्या वासराला ताब्यात घेतले.
लाड कुटुंबीयांच्या तत्परतेमुळे एका मुक्या जीवाचा प्राण वाचल्याबद्दल कौतूक होत आहे. मात्र शेतीचे दिवस सुरू असतानाही काहीजण आपल्या पाळीव जनावरांना मोकाट सोडत असल्याने अपघात होत असल्याने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत असून मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.