( राजापूर / वार्ताहर )
मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते देणाऱ्याने मोकळ्या मनाने आणि विचारांती द्यावे. देशाचे, राज्याचे भवितव्य घडवणाऱ्या आणि आपल्या नागरिकांचा विकास साधणाऱ्या निष्कलंक, चारित्र्यवान, समाजसेवी लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची सध्याची गरज आहे. पण दुर्दैवाने मतदानाचा टक्का दिवसेंदिवस घसरत आहे. आज घराघरापर्यंत आपण जाऊन मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत करूया. मतदानाचा घसरणारा टक्का वाढवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीला सदृढ व बळकट बनवण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवूया, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास पाटील यांनी केले. ते श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमात ‘चला मतदार जागृती करूया’ या विषयावर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम ए.येल्लुरे तर व्यासपीठावर प्रा. एस. व्ही. निंबाळकर, प्रा.एम.डी. देवरुखकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.डी.देवरुखकर यांनी या कालावधीत घ्यावयाच्या जनजागृतीपर उपक्रम, पथनाट्य, रॅली, निबंध स्पर्धा यासंदर्भात माहिती दिली. मतदार जनजागृती करण्यासाठी तरुणाईने पुढे येणे गरजेचे असून, त्यांनी घराघरापर्यंत पोहोचून तेथील मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन, त्यांना सहकार्य करून, मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. नाव नोंदणी पासून वंचित असणाऱ्या मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे आणि लोकशाहीला बळकट आणि बलवान करावे, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. ए. येल्लुरे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार यश धावडे याने मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.