(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील शीळ येथील बौद्धवाडीत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांमधून चर्चा सुरू आहे. दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत नसले तरी वाडीतील पाळीव प्राणी गायब होताना दिसून येत आहे. बिबट्या घरात घुसून पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने संचार करणाऱ्या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
जिल्ह्यात बिबट्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असुन निसर्गांच्या सवंधर्नाच्या नावाखाली वनविभागाकडुन कायद्याचे पालन करण्यात येत आहे. परंतू बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आता मानवाला दहशतीखाली जगावे लागत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शीळ बौद्धवाडी व आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर सुरू असल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. बिबट्या वाडीत प्रवेश करताच मध्यरात्री वाडीतील कुत्रे एकाच वेळी भुंकत असून सैरावैरा पळत सुटतात. यापूर्वी बिबट्याने गावातील कुत्रे फस्त केल्याचे बौद्धवाडीमधील ग्रामस्थ सांगतात. मात्र गेले चार ते पाच दिवसांपासून शीळ बौद्धवाडीमधील अमित कांबळे, संदेश पवार यांच्या घरातील पाळीव कुत्रे गायब झाल्याने बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्या घरात घुसून पाळीव प्राण्यांची शिकार करत असेल तर एखाद्या ग्रामस्थांवर ही सहज हल्ला करू शकतो त्यामुळे वनविभागाने वेळीच सावध भूमिका घेऊन बौद्धवाडीच्या जंगल भागातील परिसरात पिंजरे लावुन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी बौद्धवाडीतील ग्रामस्थ राकेश पवार यांनी केली आहे.