( संगमेश्वर )
तालुक्यातील कुरधुंडा गावमळा येथे बिबट्याने अनेक शेळ्या फस्त केल्या आहेत. त्याबाबत वन विभागाकडे तक्रार करूनही फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. कुरधुंडा येथील शेतकरी ऋषभ महेंद्र जाधव हे शेळीपालन व्यवसाय करतात. शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या असताना त्यांना भक्ष्य बनवून बिबट्याने शिकार केल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या. याबद्दल जाधव यांनी वन विभागाकडे रीतसर लेखी तक्रार केली.
वन विभागाशी संपर्क केल्यावर त्यांनी आधी बिबट्याचे फोटो, व्हिडीओ पाठवा, नंतर आम्ही दखल घेऊ, असे अजब उत्तर दिल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर कॅमेरे बसवून काही दिवस निरीक्षण करण्यात आले मात्र, त्यात बिबट्या न दिसल्याने आपण काही करू शकत नसल्याचे वन विभागाने सांगितल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. गुरुवारी (दि. १९) बिबट्याने पुन्हा एका शेळीवर हल्ला केला. ग्रामस्थांच्या मदतीने तिला वाचवण्यात यश आले. गेल्या काही महिन्यांत बिबट्याने अनेक शेळ्यांना भक्ष्य केल्याने आपण व्यावसायिक दृष्टीने अडचणीत आल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत आपले सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. आपण कर्ज काढून व्यवसाय करीत आहोत. वन विभागाने वेळीच कार्यवाही न केल्यास आपल्या नुकसानीला तेच जबाबदार राहतील, असे जाधव यांनी सांगितले.