(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे- जाधववाडी येथे बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी येथील वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या ‘त्या’ संशयितांकडून महत्त्वाचे धागेदोरे वनविभागाच्या हाती लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने तपास गतिमान केला आहे. बिबट्याची शिकार करणाऱ्या ‘त्या’ आदिवासी व्यक्तीच्या शोधार्थ विविध ठिकाणी पथके देखील पाठवण्यात आली आहेत.
चिपळूण वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणाचा शिताफीने छडा लावत दिलीप सावळेराम कडलग (घाटकोपर- मुंबई), अतुल विनोद दांडेकर (चेंबूर – मुंबई), विनोद पांडुरंग कदम (सावर्डे- चिपळूण), सचिन रमेश गुरव (गोविळ-लांजा) यांना गजाआड केले आहे.
या चौघांकडून ६ लाख रूपये किंमतीची बिबट्याची ८ नखे वनविभागाच्या पथकाने हस्तगत केली आहे. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा व दुचाकी देखील जप्त केली आहे. या बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणात लांजा तालुक्यातील गोविळ येथे वास्तव्यास असलेला सचिन रमेश गुरव हाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने चार-पाच वर्षापूर्वी वास्तव्यास आलेल्या एका आदिवासी व्यक्तीकडून बिबट्याची ८ नखे खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्या आदिवासी व्यक्तीने बिबट्याची नेमकी कुठे शिकार केली, याचा वनविभागाच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे.
बिबट्याची शिकार करणाऱ्या त्या आदिवासी व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी आवळण्यासाठी वनविभागाच्या पथकाने कंबर कसली आहे. त्याच्या शोधार्थ वनविभागाने विविध ठिकाणी पथके देखील पाठवल्याचे समजते. अधिक तपास विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे व त्यांचे सहकारी करत आहेत.