( संगमेश्वर /प्रतिनिधी )
तालुक्यातील कर्ली येथील सुधीर शिवाजी चाळके यांच्या राहत्या घराच्या उत्तरेला बिबट्या आज रविवारी (दिनांक २० ऑक्टोबर २०२४) मृतावस्थेत आढळून आला. संगमेश्वरमधील ग्रामीण भागात बहुतांश जंगल भाग असल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत मुक्त संचार करत असतात. मात्र बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने पंचक्रोशीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील सुयोग जाधव यांनी वनरक्षक दाभोळे यांना भ्रमणध्वनीवरून माहीती दिली. त्यांनी ही घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व वनपाल देवरुख यांना कळविले. त्यानंतर तात्काळ वनरक्षक दाभोळे, साखरपा, आरवली, फुणगुस घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी बिबट्या मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनतर घटनेची माहिती भ्रमणध्वनी वरून वनक्षेत्रपाल यांना कळवली व त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. येथील परिसरात ठिकठिकाणी रक्त पडल्याचे दिसून आले. त्याचबरोबर बिबट्याच्या डाव्या पायाच्या वरील बाजूस गळ्याच्या खाली ठिकठिकाणी चावा घेतल्याच्या खुणा निदर्शनास आल्या. मृत बिबट्या अंदाचे 2.5 वर्षाचा असुन नर जातीचा होता.
दरम्यान मृत बिबट्याला देवरुख येथे आणून मा. पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख यांचेमार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. तसेच दोन प्राण्यांच्या झटापटीमध्ये हा बिबट्या मृत झाल्याचे पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत बिबट्याचे शवविच्छेदन सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैधकीय सर्वं चिकीसलय श्री युवराज शेट्ये यांनी केले.
या मृत बिबट्याला लाकडाची चिता रचून दहन केले , ही कार्यवाही मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम .प्रियांका लगड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल श्री प्रकाश सुतार, वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक दाभोळे श्री. अरुण माळी, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक फुणगुस श्री आकाश कडुकर, वनरक्षक आरवली श्री सुरज तेली यांनी केली तसेच श्री समीर चाळके, श्री संतोष चाळके व ग्रामस्थ उपस्थित होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण यांनी केले आहे.