( राजापूर / तुषार पाचलकर )
रविवार दिनांक 11/08/2024 रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मौजे- येरडव पैकी पाटीलवाडी ता. राजापूर, येथील श्री.किसन वसंत दळवी यांना वन्यप्राणी बिबट्या बछडा सापडला असल्याची प्रथम माहिती अनिकेत सक्रे यांनी पत्रकार श्री.तुषार पाचलकर यांना दिली. याची तात्काळ दखल घेत पत्रकार पाचलकर यांनी सदरची बाबत ची माहिती परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. त्यांनी सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवले.
त्यांनंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन श्री.किसन वसंत दळवी यांचेकडून मादी जातीचा बिबट्या बछडा वय सुमारे ७ ते ८ दिवस असून त्याला ताब्यात घेऊन सापडलेल्या ठिकाणी पहाटे पर्यंत बछड्याला मादीला मिळवण्याचा प्रयत्न केला असून मादी आलेली नाही. त्यानंतर वन अधिकारी यांनी सदर बछड्याला ताब्यात घेतले असून बिबट्या बछड्याला पशुधन विकास अधिकारी राजापूर श्री.प्रभात किनरे यांचे कडून तपासणी करून घेतली असता, सदर बछडा सुस्थितीत असल्याची माहिती दिली.
विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री.वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री.किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बछड्यास मादीला मिळवण्याचा प्रयत्न चालू आहेत. सदर कामगिरीसाठी सहाय्यक वनसंरक्षक श्री.वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल श्री.किरण ठाकूर, वनपाल राजापूर श्री.जयराम बावदाणे , वनपाल लांजा श्री.दिलीप आरेकर,वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार, वनरक्षक कांदळवन श्री किरण पाचार्णे व रेस्क्यू टीमचे श्री.दीपक चव्हाण, श्री.विजय म्हादये, श्री.दीपक म्हादये, श्री.गणेश गुरव, श्री.निलेश म्हादये उपस्थित होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्री.किरण ठाकूर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केली आहे.