(लांजा)
तालुक्यातील इंदवटी येथील महिलेच्या खुनानंतर पश्चिम बंगाल येथून सहा महिन्यांपूर्वी मामीला घेऊन आलेला भाचा आम्ही नवरा-बायको असल्याचे खोटे सांगून राहत असल्याचे समोर आले आहे. महिलेच्या खुनानंतर त्यांच्यातील खऱ्या नात्याचा भांडाफोड झाला. मात्र, खुनाचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. पश्चिम बंगाल येथून त्यांचे नातेवाइक लांजा येथे आल्यानंतरच खुनाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
निताई संजय मंडल (३१) याने मामी राखी पलाश मोंडल (३३) हिला सहा महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल येथून घेऊन पलायन केले होते. त्यानंतर दोघेही मुंबई येथे मिळेल त्याठिकाणी काम करून राहत होते. सव्वा महिन्यापूर्वी लांजा येथील ठेकेदार बळीराज कबीराज यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर दोघेही कामासाठी लांजात आले. ज्याठिकाणी काम असेल तिथेच ते झोपडी उभारून राहत होते. अन्य कामगारांना त्यांनी आम्ही नवरा-बायको असल्याचे सांगितले होते. ते दोघे तसेच राहत असल्याने कोणाला त्यांच्या नात्याबद्दल संशय आला नाही.
कोर्ले येथील काम संपवून ते इंदवटी येथे रस्त्याची संरक्षण भिंत बांधण्यासाठी आले होते. शनिवारी सकाळी दोघे कामावर न आल्याने ठेकेदाराच्या मुलाने झोपडीत जाऊन पाहिले असता, निताई तडफडत होता, तर राखी मोंडल या निपचित पडलेल्या होत्या.
निताई याने राखी मॉडल यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना धक्कादायक माहिती कळली आणि ते मामी भाचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे गेले सहा महिने दोघे नाते लपवून राहत असल्याचे पुढे आले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे करीत आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न
मामीने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी आणि आपण केलेला खून उघडकीला येऊ नये यासाठी निताई मंडल याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.