(लांजा)
तालुक्यातील वनगुळे येथून दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या ४४ वर्षीय मनोरुग्णाने लांजा गोडेंसकल जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. तब्बल दीड महिन्यानंतर हा प्रकार उघड झाला.
वनगुळे येथील अनिल अनंत गुरव (४४) हे आपल्या कुटुंबासमवेत शहरातील डावारा वसाहत येथे भाड्याच्या रूममध्ये राहत होते. कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून जाण्याची त्यांना सवय होती. सहा महिन्यांपूर्वीही ते घरातून निघून गेला होते. शोध घेतल्यानंतर ते सापडले. मात्र दीड महिन्यांपूर्वी ते घरातून निघून गेल्यानंतर मात्र त्याचा शोध लागला नाही. त्यांचे हे नेहमीचेच वागणे असल्याने ते परत येईल, अशी घरच्या लोकांना आशा होती.
शहरातील गुरववाडी येथील एक महिला शुक्रवारी लाकडे काढण्यासाठी गोंडेसकळ भूत देवीचे जंगल येथे गेली होती. मात्र त्यांना तेथे दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळला. घरी आल्यानंतर त्यांनी रात्री आपल्या पतीला याबाबत माहिती दिली. शनिवारी सकाळीच शहरात जोरदार चर्चा सुरू झाल्याने यांची माहिती लांजा पोलिसांना देण्यात आली.
पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, उपनिरीक्षक सुकन्या मैदाड, हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे, सचिन भुजबळराव, नासीर नावळेकर, तेजस मोरे, नितेश राणे, नाना डोर्लेकर यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता कुजलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
मृतदेहाची ओळखही पटली…
बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या अनिल गुरवची पत्नी अश्विनी ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले. अनिल यांचे कपडे, घरातून जाताना त्यांनी घातलेली मुलीची चप्पल यावरून अश्विनी यांनी मृतदेह अनिलचाच असल्याचे ओळखले.