( रत्नागिरी /प्रतिनिधी )
लांजा तालुक्यातील सर्व संविधानवादी कार्यकर्त्यांकडून अमित शहा यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी, (दिनांक ६ जानेवारी २०२४ ) छत्रपती शिवाजी चौक लांजा येथून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. माफी मागो… माफी मागो.. अमित शहा माफी मागो… भारत हमारी शान है, संविधान हमारी जान है ! अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला होता. सर्व जनमानसात निषेधाची नांदी उमटत होती. यावेळी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत शिरोमणी रविदास महाराज, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, आद. साने गुरुजी, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिकारी फातिमा शेख, श्री संत तुकाराम महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, श्री.संत जगनाडे महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, यांचे फोटो प्रत्येकाने गळ्यात अडकवून आंबेडकरी बांधव निषेध मोर्चात उतरले होते.
भव्य मोर्चामध्ये आरास अकॅडमीचे श्री.ॶॅड. सतवेसर श्री.विश्वनाथ उर्फ बबन मयेकर, श्री.अखिल नाईक, श्री एल व्ही पवार रत्नागिरी, श्री प्रभाकर गव्हाणकर, श्रीमती शमा थोडगे,श्री. पन्हळेकर गुरुजी, श्री. संदेश कांबळे, श्री एस व्ही कदम, श्री श्रीकृष्ण उर्फ बड्या हेगिष्ठे श्री. अभिजीत राजेशिर्के श्री अनिरुद्ध कांबळे, श्री काका जोशी साखरपा, श्री. नाना मानकर श्री.चंद्रकांत परवडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्चाच्या सुरुवातीला भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन आणि प्रस्ताविक श्री. चंद्रकांत परवडी यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सुधाकर कांबळे यांनी केले.
भारतरत्न तथा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत मा.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अवमनात्मक वक्तव्याबाबत लांजा शहरात सर्व आंबेडकरवादी संघटना एकत्र येऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू महामाहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देऊन माननीय अमित शहा यांचेवर संसदीय कार्यवाही करून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय विषमता नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करून देशाची संसद, न्यायपालिका,विधिमंडळ तयार केले.याद्वारे भारत देश लोकशाही संसदेने चालत आहे असे असताना भारतीय संसदेबाहेर अनेक वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला. घटनेच्या चौकटीत असल्याचे भाष्य करून अनेक राजकीय नेते मनुवादी विचारसरणीला खतपणी घालत आहेत. भारतीय संसद ही धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा आत्मा असून भारतीय संसद ही धर्मनिरपेक्ष लोकशाही पद्धतीने चालते. परंतु सध्या भारतीय राजकारणात सार्वभौमता, समाजवादी,धर्मनिरपेक्ष लोकशाही चालत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
यायुढे, राष्ट्रपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करून भारतीय विषमतेला तेलांजली दिली,आणि भारतामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता यांच्या अंमलबजावणी करिता संविधानाची निर्मिती केली. अशा देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव सन्मान जगभरात होत असल्याचे दुःख प्रस्थापित मनुवादी विचारसरणीला होत आहे.याचाच भाग म्हणून संसदेत केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांनी त्यांचे संसदीय संभाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबत बेताल वक्तव्य करून अपमान केला आहे.अशी वृत्ती संसदीय कामकाजास लाजिरवाणी ठरते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती भारतीय जनतेत प्रबळनिष्ठा आहे. भारतीय लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब हा श्वास आहे,तो घेतल्याशिवाय भारतीय जनता जगूच शकत नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
मा. केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा यांनी केलेल्या संसदेतील वक्तव्यामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे .जनतेमध्ये प्रक्षोभ विचारसरणी जन्म घेत आहे. भारतीय जनतेची विचारधारा बुद्धाच्या शांततेकडे नेण्याचे काम वास्तविक संसदीय सदस्यांनी करणे गरजेचे असताना, अशा पद्धतीने महापुरुषांचा अपमान करून आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून अशांतता पसविण्याचे काम गृहमंत्र्यांच्या वक्तव्याने निर्माण झाले आहे. भारताचे संविधान राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा जर कोणी अवमान करेल त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल होणे आवश्यक असते तसेच राष्ट्रपुरुषाचा अवमान करणे हे देखील गुन्हा आहे. समाज हितासाठी देशहितासाठी, राष्ट्र बांधणीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी, संविधान संरक्षणासाठी सर्व समाज घटक लांजामध्ये जागृत झालेले आहेत असे चित्र मोर्चाला आलेल्या सर्व समाज घटकातून दिसत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उवमान केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या भव्य मोर्चात शयासीन नेवरेकर, सूर्यकांत लांजेकर, नाना मानकर श्री.चंद्रकांत परवडी, अल्लाउद्दीन नेवरेकर, उज्वल पवार, किशोर पुनसकर , सुधाकर कांबळे, जावेद नाईक, शौकत नाईक ( पटेल), विष्णू लांजेकर, दिलीप लांजेकर, रघुनाथ कांबळे, आनंदा माजळकर ,संजय कणगोलकर, धाकट्याशेठ रखांगी,अल्लाउद्दीन नेवरेकर, हुसेन नेवरेकर, सुरेश कांबळे, नितीन शेट्ये, सचिन लिंगायत गुरव, राजेश उर्फ राजू राणे, रामचंद्र देवधेकर, माझी पोलीस पाटील देवधे भिकाजी कांबळे यांच्यासह अनेक विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटनेचे पदाधिकारी आणि बहुसंख्य महिला वर्ग, आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.